कर्जाच्या बहाण्याने फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

पुणे - कर्ज देण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर गुन्हे शाखेने दिल्लीतून अटक केली. त्याच्या ताब्यातून पाच मोबाईल, चार सिमकार्ड आणि 87 हजारांची रोकड जप्त केली आहे.

पुणे - कर्ज देण्याचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला सायबर गुन्हे शाखेने दिल्लीतून अटक केली. त्याच्या ताब्यातून पाच मोबाईल, चार सिमकार्ड आणि 87 हजारांची रोकड जप्त केली आहे.

अजितकुमार महेंद्रसिंग कुशवाह (वय 30, रा. पटेलनगर, नवी दिल्ली) असे आरोपीचे नाव आहे. आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे येथील एका महिलेला चार महिन्यांपूर्वी अनोळखी व्यक्‍तीने फोन करून रिलायन्स सर्व्हिसेसमधून कर्ज देतो, असे सांगितले. त्यावर या महिलेने कर्जाची आवश्‍यकता असल्याचे कळविले. त्यावर त्या व्यक्‍तीने महिलेसह दोघींना त्यांचे कर्ज मंजूर झाले असून, दिल्ली येथील पत्त्यावर कागदपत्रे पाठवा, असे ई-मेलवर सांगितले. त्यानुसार या महिलांनी कागदपत्रे पाठविल्यानंतर प्रोसेसिंग शुल्क आणि कर्ज हस्तांतरित करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून एक लाख 41 हजार रुपये उकळले. या महिलांना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रार दिली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, सायबर गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राधिका फडके यांच्या पथकाने दिल्लीच्या साउथ पटेलनगर येथील कॉल सेंटरवर छापा टाकून आरोपीला अटक केली. आरोपी अजितकुमार कुशवाह हा बी. एस्सी. उत्तीर्ण असून, मूळ मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील आहे. तो दिल्लीत एका कंपनीत नोकरी करीत होता. ती कंपनी बंद पडल्यानंतर त्याने दिल्ली येथील शादीपूर मेन बाजार येथील कॉल सेंटर चालू करून लोकांची फसवणूक करण्यास सुरवात केली.

पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ आणि सहायक आयुक्‍त मिलिंद पाटील यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक राधिका फडके, उपनिरीक्षक नितीन खामगळ, कर्मचारी दीपक भोसले, राजकुमार जाबा, अमित औचरे, योगेश वाव्हळ, प्रसाद पोतदार, पूजा डहाळे, संतोष जाधव, राजू भिसे, दीपक माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.