छवी राजावत यांचे आज पुण्यात व्याख्यान 

छवी राजावत यांचे आज पुण्यात व्याख्यान 

पुणे  - "सकाळ'चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या 120व्या जयंतीनिमित्त राजस्थानमधील सोडा गावाच्या सरपंच छवी राजावत यांचे व्याख्यान आयोजिण्यात आले आहे. "सामाजिक बदलाव में युवा शक्ती का महत्त्व' असा राजावत यांच्या व्याख्यानाचा विषय असून, बालगंधर्व रंगमंदिरात आज (ता. 20) सायंकाळी साडेपाच वाजता हे व्याख्यान होणार आहे. 

राजावत या एमबीए असलेल्या भारतातील पहिल्या महिला सरपंच आहेत. नामवंत कॉर्पोरेट कंपनीतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून गावात बदल घडवावा, यासाठी त्या आपल्या गावाकडे परतल्या. सरपंचपदाची जबाबदारी स्वीकारल्यावर जलपुनर्भरण, रस्तेबांधणी, सौरऊर्जा, स्वच्छ पाणी अशा अनेक कामांना त्यांनी विलक्षण गती दिली. संयुक्त राष्ट्र संघाने 2011 मध्ये आयोजिलेल्या जागतिक संमेलनात त्यांच्या व्याख्यानास मोठा प्रतिसाद मिळाला होता. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील सन्मानांनी राजावत यांना आजवर गौरविण्यात आले आहे. डॉ. परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळाली आहे. 

उल्लेखनीय काम करणाऱ्या काही व्यक्तींचा गौरव या समारंभात राजावत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. गावाच्या विकासासाठी झटणारे सरपंच भाऊ मरगळे (वेगरे), संतोष टिकेकर (टिकेकरवाडी), गंगूबाई आंबेकर (कान्हेवाडी) यांच्याबरोबरच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा सांभाळ करणारे सामाजिक कार्यकर्ते अशोक आणि अर्चना देशमाने, अपघातग्रस्त तरुणाला वेळेवर मदत करणाऱ्या सानिया कुलकर्णी, ऋतुजा बुडुख, रझिया खान या महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा त्यात समावेश आहे. याशिवाय "सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम'चे (एसआयटी) वरिष्ठ बातमीदार गोविंद तुपे, "सकाळ'च्या मुंबई आवृत्तीचे बातमीदार किरण कारंडे आणि हर्षदा परब यांना "डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार' या वेळी प्रदान करण्यात येणार आहे. 

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. श्रोत्यांनी कार्यक्रमाच्या वेळेआधी सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com