अर्थमंत्र्यांसमोर गायकांनी आळवला 'राग'

अर्थमंत्र्यांसमोर गायकांनी आळवला 'राग'

पुणे - शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांवर 28 टक्के आणि कलाकारांच्या मानधनावर 18 टक्के लागू झालेला "जीएसटी' तातडीने रद्द करा; अन्यथा शास्त्रीय संगीत नामशेष होईल, अशा शब्दांत शास्त्रीय गायक-वादकांनी रविवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासमोर जीएसटीविरोधात "राग' आळवला. अनेक दिग्गजांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदनही या कलाकारांनी जेटली यांना दिले.

"सा' व "नी' संस्थेचे सुरेंद्र मोहिते यांनी पुढाकार घेऊन हे निवेदन तयार केले होते. त्यावर पं. जसराज, पं. शिवकुमार शर्मा, पं. हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद झाकिर हुसेन, डॉ. एन. राजम, डॉ. प्रभा अत्रे, तालयोगी पं. सुरेश तळवलकर, पं. उल्हास कशाळकर, पं. राजन-साजन मिश्रा, विजय घाटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. एका कार्यक्रमानिमित्त जेटली पुण्यात आले असता हे निवेदन मोहिते, तळवलकर, कशाळकर यांनी त्यांना दिले.

श्रोत्यांना शास्त्रीय संगीताच्या तिकिटावर 28 टक्के जीएसटी भरावा लागत आहे. हा कर जास्त असून, मध्यमवर्गीयांना यापुढे कार्यक्रमांना जाणे अवघड होणार आहे. कलाकारांच्या मानधनावरही जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे संयोजकांना कलाकारांचे मानधन परवडत नाही. अशा कारणांमुळे छोट्या शहरांमधील शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होणे जवळजवळ बंदच झाले आहे, असे पत्रातून अर्थमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

या पत्राची दखल घेतली गेली नाही; तर सर्व कलावंत पंतप्रधानांची भेट घेतील, असे मोहिते यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com