'शास्त्रीय संगीत प्रायोजकांच्या हातात'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

पुणे  - ""आजचा शास्त्रीय संगीताचा व्यवसाय प्रायोजकांच्या हातात गेला आहे; पण सामान्य रसिक हाच संगीताचा आश्रयदाता हवा. संगीत अधिकाधिक सामान्य रसिकांपर्यंत न्यायचे असेल तर शास्त्रात एकवाक्‍यता हवी. शास्त्र समजायला सहज-सोपे हवे. संगीत समजून ऐकणाऱ्यांची संख्याही वाढायला हवी. शेवटी समजून ऐकणे, हीदेखील एक कला आहे. त्यासाठी साधनेची आवश्‍यकता आहे,'' अशा शब्दांत शास्त्रीय संगीताबद्दल भरभरून बोलत होत्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे. 

गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाउंडेशनचा "स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कार' गायक डॉ. विकास कशाळकर यांना प्रभाताईंच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यानंतर प्रभाताईंनी आपल्या भाषणातून शास्त्रीय संगीतातील बदलांवर भाष्य केले. शिवाय, श्रोत्यांनी अधिक जाणकार व्हायला हवे, याकडेही लक्ष वेधून घेतले. ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, संस्थेचे संस्थापक कृ. गो. धर्माधिकारी, प्रसाद भडसावळे, शारंग नातू उपस्थित होते. 

प्रभाताई म्हणाल्या, ""संगीताचा व्यवसाय करणाऱ्या बहुतेकांना मंच प्रदर्शन करायचे असते. संगीताच्या इतर पैलूंचा अभ्यास त्यांना आवश्‍यक वाटत नाही आणि रसिक म्हणून आम्हीही तिकडे दुर्लक्ष करतो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. संगीत प्रस्तुतीकरण आणि संगीतशास्त्र ही संगीताची दोन प्रमुख अंग आहेत. एकमेकांचा हात धरून त्यांनी चालायला हवे; पण आज तसे होताना दिसत नाही. कालबाह्य झालेल्या कितीतरी गोष्टी, आज शास्त्र आणि परंपरेच्या नावाखाली पाळल्या जात आहेत. शिकवल्या जात आहेत. हे आपल्याला कळले पाहिजे.'' 

कशाळकर म्हणाले, ""मी व्यावसायिक गायक नाही. कलोपासक, प्रयोगशील कलावंत होण्याचा प्रयत्न करत आहे. प्रभाताईंना आदर्श मानूनच वाटचाल करत आलो आहे.'' प्राची घोटकर यांनी सूत्रसंचालन केले. 

"विरोधकांचेही कौतुक करते' 
""आयुष्याचा लांबचा पल्ला मी गाठला आहे. वयाची 85 वर्षे पूर्ण केली आहेत. रसिकांच्या प्रेमामुळे नेहमीच बळ मिळाले. तसे विरोधकांच्या टीकेमुळेही. म्हणूनच विरोधकांचेही मला कौतुक करायचे आहे. माझ्या कामाकडे दुर्लक्ष करणे, माझ्या नावाचा उल्लेख टाळणे, माझ्या सांगीतिक विचारांबद्दल गैरसमज पसरविणे हे अतिशय मोलाचे काम विरोधकांनी केले; या विरोधामुळे माझी जिद्द अधिक धारदार होत गेली, आत्मविश्‍वास वाढत गेला, विचार अधिक स्पष्ट होत गेले,'' अशा भावनाही प्रभाताईंनी व्यक्त केल्या.