आदेश पाळण्यापुरती स्वच्छता मोहीम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

विघटनानंतरही 400 टन कचऱ्याची समस्या; जनजागृती अद्याप कमीच

विघटनानंतरही 400 टन कचऱ्याची समस्या; जनजागृती अद्याप कमीच
पुणे - सार्वजनिक स्वच्छतेचे उद्दिष्ट साधण्यासाठी "स्वच्छ भारत अभियान' या योजनेची हाकाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली असली, तरी स्थानिक पातळीवर स्वच्छ भारताबद्दल अजूनही जागरूकतेची आवश्‍यकता असल्याचे सध्याचे चित्र आहे. सार्वजनिक रस्त्यावर पडणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण वाढत असतानाच प्रक्रियेची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे, तर प्रशासकीय स्तरावर "आदेशापुरती मोहीम' असल्याचे दिसते.

स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्‍टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियानाचे उद्‌घाटन केले. त्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी खेळाडू, अभिनेते आदींचीही मदत घेण्यात आली. स्थानिक पातळीवरही महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदांनी भव्यदिव्य कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यासाठी प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपआपल्या भागात नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करून स्वच्छता मोहिमा आयोजित कराव्यात, असे उद्दिष्ट होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात स्वयंसेवी संस्था, उद्योगसमूह, सामाजिक संस्था, शाळा- महाविद्यालये आदींनी मोठा सहभाग नोंदविला. परंतु त्यानंतर मात्र, उत्साह कमी होत गेला आणि रस्त्यावर साठत असलेल्या कचऱ्याचे वास्तव पुन्हा एकदा अधोरेखित होऊ लागले.

पुण्यात पहिल्या टप्प्यात महापालिका प्रशासनाने जनवाणी, स्वच्छ, रोटरी क्‍लब यांच्यासह विविध संस्था व संघटनांच्या मदतीने सार्वजनिक स्वच्छतेसाठी मोहिमा राबविल्या. त्यातून कचऱ्याचे संकलन फारसे झाले नाही, तरी मानसिकता निर्माण करण्यासाठी त्या उपयुक्त ठरल्या. पाठोपाठ शाळा- महाविद्यालयांनी रस्ते, नदी, गड, ऐतिहासिक स्थळे स्वच्छ केली. सरत्या वर्षात देशातील 25 स्वच्छ शहरांत पुण्याने 13 वा क्रमांक पटकावला. तर, हगणदारीमुक्त शहर, असा राज्य सरकारचाही पुरस्कार पटकविण्यात यश मिळविले. शहरात 1600 टन कचरा रोज निर्माण होतो, त्यातील सुमारे 1200 टनांवर प्रक्रिया व विघटन होते.

मात्र, 400 टन कचऱ्याची समस्या शहरापुढे आहेच. त्यातून मार्ग काढण्यासाठी आता बहुविध पर्यायांचाही आराखडा तयार करून अंमलबजावणीच्या टप्प्यावर महापालिका आहे. ई-वेस्ट, बायोमेडिकल वेस्ट, सॅनिटरी नॅपकीन डिस्पोजेबल मशिन्स, प्लॅस्टिक बिन्स आदींबाबतही योजना सुरू झाल्या आहेत. तर, नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. दोन ऑक्‍टोबरला मोहिमेची सांगता होईल. मात्र, ज्या नागरिकांवर स्वच्छतेची जबाबदारी आहे, तो मुख्य घटक मोहिमेपासून दूर राहिला आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी नगरसेवकांना सहभागी करून घेण्यात आल्याने तेवढ्यापुरता स्वच्छता मोहिमेत नागरिकांचा समावेश राहिला आहे.

सामान्यांचा सहभाग नसल्यासारखाच
नाशिकमध्ये पंधरा सप्टेंबरला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्‌घाटन झाले. महापालिकेला पहिल्याच दिवशी एक लाख लोक मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा होती; परंतु फक्त 28 हजार लोक सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी शहरात सव्वातीनशे टन कचरा गोळा झाला. उर्वरित चौदा दिवसांमध्ये सरासरी बारा ते चौदा टन कचरा शहरात गोळा झाला. सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग नसल्यासारखाच राहिला आहे. सरकारी कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी असे प्रत्येक सेक्‍टरनिहाय दररोज साठ ते सत्तर जागा निश्‍चित करून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू राहिल्यास नागरिकांचा सहभाग वाढेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: pune news cleanign campaign