तरुणाई झाली ‘स्वच्छतादूत’

तरुणाई झाली ‘स्वच्छतादूत’

पुणे - ‘‘आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याचप्रकारे आपल्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ ठेवायला हवा. त्यासाठी विशेष दक्षता घेतली पाहिजे. ‘स्वच्छ पुणे’, ‘स्वच्छ भारत’ हे स्वप्न साकार करण्यासाठी पुढाकार घेऊ,’’ असा निर्धार ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी केला.

एरवी सलग तीन सुट्या जोडून आल्याने तरुणाई ‘एन्जॉयमेंट’मध्ये रमलेली असते; पण सोमवारी सकाळी या तरुणाईची पावले आपसुकच मुठा नदीपात्राकडे वळली, ती चक्क हातात झाडू घेऊनच...‘स्वच्छतादूत’ म्हणून आलेले तरुण-तरुणी उडणाऱ्या धुळीची पर्वा न करता अन्‌ अस्वच्छतेला न जुमानता ‘सकाळ माध्यम समूह’ आणि अन्य स्वयंसेवी संस्थांनी आखलेल्या ‘स्वच्छता मोहिमे’त सहभागी झाले. दीड तासात नदीकाठचा काही भाग स्वच्छ करत त्यांनी आदर्श घालून दिला. ‘आम्ही रस्त्यावर कचरा टाकणार नाही, इतरांना टाकू देणार नाही’, अशी प्रतिज्ञा घेत शेकडो तरुणांनी पुणे शहर स्वच्छ ठेवण्याचा निर्धार केला.

‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ हे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली ती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आणि केंद्र सरकारने या दिवशी केलेल्या ‘स्वच्छता हीच पूजा’ या आवाहनाचे औचित्य साधण्यासाठी. या मोहिमेत मुठा नदीच्या पात्रातील जयंतराव टिळक पुलापासून ते ओंकारेश्‍वर पुलापर्यंचा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यात स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महाविद्यालयातील तरुण-तरुणी हातात झाडू आणि कचरा गोळा करण्यासाठी पिशव्या घेऊन सहभागी झाले. या मोहिमेत निरंजन सेवाभावी संस्था, रोटरी क्‍लब ऑफ सिंहगड रोड अशा विविध संस्थांच्या स्वयंसेवकांसह सर परशुराम महाविद्यालय, बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी), फर्ग्युसन महाविद्यालय, मराठवाडा मित्रमंडळ वाणिज्य महाविद्यालयातील पत्रकारिता विभाग अशा विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. नदीपात्रात स्वच्छता करत असताना विद्यार्थ्यांनी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आणि आसपासच्या परिसरात कचरा न टाकण्याची हात जोडून विनंतीही केली.

‘सकाळ माध्यम समूहा’तील संपादकीय, वितरण आदी विभागांतील कर्मचारी, तसेच सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ, बीएमसीसीचे कार्यक्रम अधिकारी सूर्यभान गर्जे, निरंजन सेवा भावी संस्थेचे जयेश कासट, डॉ. विलास उगले, डॉ. सुनील शिंदे आदींनी मोहिमेत भाग घेतला. 

मोहिमेत सहभागी झालेल्यांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. राष्ट्रगीताने मोहिमेची सांगता झाली.

‘स्वच्छते’ची प्रतीक्षा
आम्ही रस्त्यावर कचरा टाकणार नाही, इतरांना टाकू देणार नाही. कचरा इतरत्र न टाकता कचरापेटीतच टाकू. आमचे शहर, आमचा देश स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आणि कर्तव्य आमचेच आहे. परिसराची स्वच्छता राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू, अशी प्रतिज्ञा या वेळी युवकांनी केली. 

गुटख्याची पाकिटे सर्वाधिक
संपूर्ण राज्यात गुटखाबंदी असतानाही गुटख्याची विक्री सर्रासपणे होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. ‘सकाळ’ने सोमवारी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेत गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यात गुटख्याच्या रिकाम्या पुड्यांचे प्रमाण सर्वाधिक होते. त्यामुळे राज्य सरकारचा गुटखाबंदीचा दावा फोल असल्याचे स्पष्ट झाले. तसेच रुग्णालयातील इंजेक्‍शनच्या वापरून झालेल्या सीरिन तसेच इतर साहित्यही प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून थेट नदीपात्रालगत फेकून देण्यात आल्याचेही दिसून आले.

सहा कंटेनर कचरा जमा
नदीपात्रात जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीग या मोहिमेदरम्यान उचलण्यात आले. स्वच्छता मोहिमेदरम्यान जवळपास पाच ते सहा कंटेनर इतका कचरा विद्यार्थ्यांनी आणि स्वयंसेवकांनी उचलला. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वाहनांतून हा कचरा डेपोत नेण्यात आला.

स्वच्छता ही आपली वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारी आहे, याचे भान सर्वांना येण्याची गरज आहे. स्वच्छता हे राष्ट्रीय कर्तव्य मानून प्रत्येकाने त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. तरच ‘स्वच्छ भारत’, ‘स्वच्छ पुणे’ हे स्वप्न साकार होईल.
- निहारिका गांजूल

आपण घरात ठिकठिकाणी कचरा टाकत नाही; मग शहरात येता-जाता कचरा का टाकतो, हा प्रश्‍न प्रत्येकाने स्वत:ला विचारायला हवा. घराप्रमाणेच आसपासच्या परिसर स्वच्छतेसाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे.
- प्रतीक्षा म्हेत्रे

आसपासचा परिसर स्वच्छ ठेवणे, हे आपले राष्ट्रीय कर्तव्य मानायला हवे. तरच, खऱ्या अर्थाने ‘स्वच्छ भारत’ हे स्वप्न पूर्ण होईल. यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
- भूषण सोळंके

स्वच्छतेसाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. रस्त्यात कचरा टाकणार नाही, टाकू देणार नाही, असा निर्धार प्रत्येकाने करायला हवा. स्वच्छतेबाबत जनजागृतीची गरज आहे. तसेच, सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.
- सौरव कांबळे
 

आपण खाऊ खाल्ल्यानंतर त्याचे रॅपर, प्लॅस्टिकची पिशवी, वापरलेले कागद कचरा रस्त्यावर न टाकता, तो कचरापेटीतच टाकावा, हे संस्कार विद्यार्थिदशेपासूनच होण्याची गरज आहे.
- अक्षय तोडकर
 

स्वच्छता मोहीम केवळ त्या दिवसापुरती मर्यादित राहू नये, तर ती कायमस्वरूपी राबविली पाहिजे. परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी अशा प्रकारची मोहीम राबवावी लागते, हे दुर्दैव आहे. स्वच्छतेचे संस्कार रुजवायला हवेत.
- संतोष शेळके
 

पहिल्यांदाच स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभागी होत आहे. स्वत:हून स्वच्छता करण्याचा आनंदी काही वेगळाच असतो. या मोहिमेतून वेगळ्या प्रकारचे समाधान मिळत आहे. 
- मोहिनी मराठे

आपण स्‍वच्‍छता मोहीम छोट्या-छोट्या बदलांतून राबवू शकतो. कचरा रस्त्यावर टाकला जाणार नाही, याची खबरदारी सगळ्यांनी घेतली तर आपण सकारात्मक बदल घडवून आणू शकतो.
- राधिका जाधव

संपूर्ण देशाला, शहराला आपले घर समजायला हवे. तरच आपल्या घरात आपण कचरा टाकणार नाही. त्यामुळे परिसराला घर समजण्याचे आणि स्वच्छतेचे संस्कार घरातूनच होण्याची गरज आहे.
- विशाल मोरे  

शहरच नव्हे, तर देश स्वच्छ ठेवणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य मानायला हवे. या मोहिमेत उतरून वर्षभर काम करायला हवे. त्यातून प्रेरणा घेऊन इतर नागरिकही सहभागी होतील आणि स्वच्छतेचे महत्त्व पटेल.
- यश काटे
 

शहराची स्वच्छता आमच्या हातून झाल्याचा अभिमान वाटत आहे. खारीचा वाटा उचलता आल्याचे समाधान आहे. ‘स्वच्छ पुणे’ हे स्वप्न साकारण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
- ऋचा कुलकर्णी
 

दररोजच स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. आपल्या आसपासच्या परिसराची स्वच्छता राखणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजायला हवे. तरच, ‘स्वच्छ भारत’चे स्वप्न साकार होईल.
- दिव्या गायकवाड
 

अनेक नागरिक, विद्यार्थी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन नदीपात्राचा परिसर स्वच्छ करत आहेत. छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद करण्याचा माझा प्रयत्न आहे. या माध्यमातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी मी मोहिमेत सहभागी झाले आहे.
- ऐश्‍वर्या कुलकर्णी
 

कचरा उचलण्यासाठी आम्ही मोहिमेत सहभागी झालो आहोत. नदीतून वाहत जाणारा कचरा दररोज पाहतो, तेव्हा मन अस्वस्थ होते. परंतु आज प्रत्यक्ष नदीपात्र स्वच्छ करण्याचा अनुभव घेतला. शहर स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी झाल्याचे समाधान मिळाले.
- राहुल जगताप
 

आज माझा वाढदिवस असतानाही, कोणत्याही प्रकारचे सेलिब्रेशन न करता मी स्वच्छता मोहिमेत सहभागी झालो. वाढदिवसाच्या कोणत्याही सेलिब्रेशनपेक्षा मोहिमेत सहभागी होऊन ‘शहर स्वच्छ’तेचा आनंद काही वेगळाच आहे.
- सूरज लोंढे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com