आव्हाने समोर असताना "असे' वागू नका ! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

पुणे - ""निरोप मिळाल्यावर कार्यक्रमांना उपस्थित राहणे, हे नेते आणि कार्यकर्त्यांचे काम आहे. कोणाच्या घरचे कार्य असल्यासारखा प्रत्येक वेळी निरोप मिळणार नाही, हे समजून घ्या. मोठी आव्हाने समोर असताना, "असे' वागू नका,'' अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शहर कॉंग्रेसमधील नेत्यांची हजेरी घेतली. 

पुणे - ""निरोप मिळाल्यावर कार्यक्रमांना उपस्थित राहणे, हे नेते आणि कार्यकर्त्यांचे काम आहे. कोणाच्या घरचे कार्य असल्यासारखा प्रत्येक वेळी निरोप मिळणार नाही, हे समजून घ्या. मोठी आव्हाने समोर असताना, "असे' वागू नका,'' अशा शब्दांत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी शहर कॉंग्रेसमधील नेत्यांची हजेरी घेतली. 

युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांच्या डेक्कन जिमखान्याजवळील निवासस्थानी रविवारी रात्री कॉंग्रेसच्या मोजक्‍या नेत्यांची बैठक झाली. कॉंग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष चव्हाण, शहराध्यक्ष रमेश बागवे, तसेच उल्हास पवार, मोहन जोशी, अभय छाजेड, कमल व्यवहारे, आबा बागूल, अरविंद शिंदे, सदानंद शेट्टी, हाजी नदाफ, सोनाली मारणे, मनीष आनंद, रवींद्र धंगेकर आदी उपस्थित होते. काही ब्लॉक अध्यक्ष, तसेच पक्षाचे पदाधिकारीही बैठकीस उपस्थित होते. बैठकीत शहराध्यक्ष बागवे यांनी, "काही नेत्यांना निरोप दिला, मेसेज पाठविला, फोन केला तरी कार्यक्रमांना उपस्थित राहत नाहीत. आले तरी, कार्यकर्त्यांची ताकद आणत नाहीत,' अशा आशयाचे वक्तव्य केले. त्यावर चव्हाण यांनी, "पक्षाच्या कार्यक्रमांना काही विशेष आमंत्रणाची गरज नाही. निरोप मिळाला की या. कोणी आले नाही, तर मला कळवा' असे म्हटले. तर, पक्षाचे काही नेते वाद घालतात आणि वृत्तपत्रांपर्यंत पोचतात, अशी तक्रार व्यवहारे यांनी केली. तर, पदाधिकाऱ्यांची नावे फ्लेक्‍सवर लावली जात नाहीत, असेही एकाने सांगितले. "मी शहराध्यक्ष  असतानाही असे होत असे,' अशी टिप्पणी छाजेड यांनी केली. 

सर्वांचे ऐकून घेतल्यावर चव्हाण यांनी, "आगामी काळातील आव्हानांना संघटितपणे सामोरे जाण्याची गरज आहे. परस्परांतील वाद आता तरी संपवा. वातावरण बदलत आहे, त्याचा फायदा घेण्यासाठी एकसंधपणे काम करा,' असे सांगितले. मोहन प्रकाश यांनीही एकत्रपणे काम करून पक्ष वाढविण्याचे आवाहन केले. 

"जनआक्रोश'च्या तयारीसाठी भेट 
कॉंग्रेसतर्फे "जनआक्रोश' सप्ताह सुरू आहे. त्याचा समारोप 8 नोव्हेंबर रोजी सांगलीत होणार आहे. त्यानिमित्ताने त्या दिवशी तेथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याला नागरिक, कार्यकर्त्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात राहावी, यासाठी सध्या विश्‍वजित कदम जय्यत तयारी करीत आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते भूपिंदरसिंग हुड्डा आणि राज्यातील वरिष्ठ नेते त्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मोहन प्रकाश आणि अशोक चव्हाण निवासस्थानी आले होते, असे कदम यांनी स्पष्ट केले.