आर्थिक दुष्परिणामांचे उत्तर द्या - बागवे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 नोव्हेंबर 2017

पुणे - ""काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा होईल, दहशतवादी कारवायांना आळा बसेल, देशाच्या पारदर्शी कारभाराची यातून सुरवात होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करताना सांगितले होते. मात्र, या आर्थिक भूकंपाचा दुष्परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. याचे उत्तर पंतप्रधानांनी जनतेला दिलेच पाहिजे,'' अशी टीका कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी बुधवारी येथे केली. 

पुणे - ""काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा होईल, दहशतवादी कारवायांना आळा बसेल, देशाच्या पारदर्शी कारभाराची यातून सुरवात होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी करताना सांगितले होते. मात्र, या आर्थिक भूकंपाचा दुष्परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. याचे उत्तर पंतप्रधानांनी जनतेला दिलेच पाहिजे,'' अशी टीका कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी बुधवारी येथे केली. 

नोटाबंदीला एक वर्ष झाल्याच्या निमित्ताने पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे "जनआक्रोश मोर्चा' काढण्यात आला होता. त्यात ते बोलत होते. स. प. महाविद्यालय ते पुरम चौकातील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत काढलेल्या मोर्चात सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. "जनता त्रस्त, सरकार मस्त' अशा प्रकारचे नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करणारे फलक कार्यकर्त्यांच्या हाती होते. 

बागवे म्हणाले, ""नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाच्या विकासाला खीळ बसली आहे. दोन टक्‍क्‍यांनी देशाचा विकासदरात घट झाली आहे. देशभरातील 15 लाख लोक बेरोजगार झाले आहेत. औद्योगिक क्षेत्रात मंदी आली. परकी गुंतवणूक घटली. लघुउद्योग व मध्यम उद्योग संकटात सापडला आहे. त्याविरोधात देशव्यापी आंदोलन सुरू केले आहे. समाजातील प्रत्येक घटकावर याचा दुष्परिणाम झाला. त्यामुळे याचे उत्तर पंतप्रधानांनी देशाच्या जनतेला दिले पाहिजे.'' 

आमदार उल्हास पवार म्हणाले, ""नोटाबंदीने खेळखंडोबा केला आहे. ज्या उद्देशाने नोटाबंदीचा निर्णय घेतला तो प्रत्यक्षात आला नाही. त्यामुळे नोटाबंदीचा दुष्परिणाम देशाला भोगावा लागत आहे.'' 

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन म्हणाले, ""नोटाबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे मत बहुसंख्य अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले. एका बाजूला देशातील अर्थतज्ज्ञ हे अभ्यासपूर्ण मत मांडत असतानाच, देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली वस्तुस्थितीचा विचार न करता नोटाबंदीमुळे देशाची प्रगती झाल्याचे ठामपणे सांगत आहे. हे चित्र हास्यास्पद आहे.'' 

आमदार मोहन जोशी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे सरचिटणीस अभय छाजेड, अखिल भारतीय महिला कॉंग्रेस सरचिटणीस कमल व्यवहारे, महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, रोहित टिळक, गोपाळ तिवारी, संजय बालगुडे, आबा बागूल, सदानंद शेट्टी, रवींद्र धंगेकर, अविनाश बागवे, अजित दरेकर आदी उपस्थित होते.