‘स्मार्ट’ कामांबाबत नगरसेवकच अनभिज्ञ!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जुलै 2017

माहिती देण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे आज बैठकीचे आयोजन 

पुणे - स्मार्ट सिटीचा प्रकल्प ज्या भागात राबविला जात आहे, तेथील नगरसेवकांना याची माहिती देण्यासाठी महापालिका प्रशासनाने अखेर पाऊल उचलले आहे. औंध- बाणेर बालेवाडी येथील नगरसेवकांना सोमवारी या प्रकल्पांची माहिती देण्यात येणार आहे. 

माहिती देण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे आज बैठकीचे आयोजन 

पुणे - स्मार्ट सिटीचा प्रकल्प ज्या भागात राबविला जात आहे, तेथील नगरसेवकांना याची माहिती देण्यासाठी महापालिका प्रशासनाने अखेर पाऊल उचलले आहे. औंध- बाणेर बालेवाडी येथील नगरसेवकांना सोमवारी या प्रकल्पांची माहिती देण्यात येणार आहे. 

महापालिकेतील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांबाबत अनभिज्ञ आहेत. हा प्रकल्प ज्या भागात राबविला जात आहे, त्या औंध-बाणेर बालेवाडी परिसरात भाजपचे तब्बल सात म्हणजे प्रकाश ढोरे, विजय शेवाळे, सुनीता वाडेकर, अर्चना मुसळे, अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकल, ज्योती कळमकर हे नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबूराव चांदेरे आहेत. 

महापालिका निवडणूक होऊन पाच महिने झाले तरी, या भागात स्मार्ट सिटीचे कोणते प्रकल्प राबविले जात आहेत, या बद्दल नगरसेवकांना प्रशासनाने माहिती दिली नव्हती. त्या बाबत बालवडकर यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांची माहिती द्या, त्यात नगरसेवकांच्या सूचनांचाही समावेश करावा, नागरिकांबरोबर संयुक्त बैठक घ्या, आदी मागण्या त्यांनी केल्या होत्या. 

स्मार्ट सिटी साकारताना त्यात अर्धवट राहिलेल्या प्रकल्पांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्या आणि ते मार्गी लावा, अशी मागणी चांदेरे यांनी केली आहे. या पार्श्‍वभूमीवर स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी सोमवारी दुपारी बारा वाजता औंध क्षेत्रिय कार्यालयात बैठक आयोजित केली आहे. त्यात दोन्ही प्रभागांतील आठ नगरसेवकांना आमंत्रित करण्यात आले आहे.

बाणेर -बालेवाडीमध्ये भाजी मंडई, अग्निशाम दलाचे केंद्र नाही. सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता आहे. दवाखान्याचे काम रखडले आहे. पिण्याचे पुरेसे पाणी नाही. रस्त्यांच्या कामाकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना विरोध नाही. पण, पायाभूत सुविधांची पूर्तता तातडीने केली पाहिजे. स्मार्ट सिटीअंतर्गत दोन उद्याने साकारात आहे, पण दोन्हीत फक्त १५० मीटर अंतर आहे. अशा नियोजनाचा उपयोगच नाही.
- अमोल बालवडकर, नगरसेवक