दान करायला गेला नि हातांत पडल्या बेड्या!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

पुणे - रांजणगाव एमआयडीसीतून अंबरनाथला जाणारा सिगारेटचा कंटेनर चोरट्यांनी अडवला. चालकाला मारहाण करून, त्याचे हातपाय
बांधून माल रिकामा करण्यासाठी कंटेनर नाशिकला नेण्यात आला.

पुणे - रांजणगाव एमआयडीसीतून अंबरनाथला जाणारा सिगारेटचा कंटेनर चोरट्यांनी अडवला. चालकाला मारहाण करून, त्याचे हातपाय
बांधून माल रिकामा करण्यासाठी कंटेनर नाशिकला नेण्यात आला.

कंटेनरमध्ये आयटीसी कंपनीच्या सिगारेटचे 865 बॉक्‍स होते. त्यांची किंमत एक कोटी 87 लाख 54 हजार 817 रुपये इतकी होती. सुपे टोल नाक्‍यावर एका तृतीयपंथीयाला पैशांचे दान देण्याच्या नादात दुचाकीवर असलेले दोन गुन्हेगार सीसीटीव्हीत कैद झाले. सविस्तर तपासात कंटेनरच्या मागे दुचाकी, तर पुढे चारचाकी गाडीतून पाचजण लक्ष ठेवून होते. अखेर सुमारे दोन कोटी रुपयांच्या मुद्देमालासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधारासह अन्य तिघांचा शोध सुरू आहे.

या संदर्भात सविस्तर माहिती देताना पुणे ग्रामीण पोलिस जिल्हा अधीक्षक सुवेझ हक म्हणाले, 'आठ सप्टेंबर रोजी लोणावळ्यातील वरसोली टोल नाक्‍यावर अंबरनाथला सिगारेटचे बॉक्‍स घेऊन जात असलेला कंटेनर पाच जणांनी अडवला. त्यातील दोघे दुचाकीवरून आले होते, तर तिघे चारचाकीतून आले होते. चालकाला लाथा- बुक्‍क्‍यांनी मारहाण करून त्याच्याकडील साडेसात हजारांची रोकड आणि मोबाईल हिसकावून घेऊन त्याचे हातपाय बांधले आणि कंटेनर नाशिकच्या दिशेने वळविला. दरम्यान, कंटेनर इच्छितस्थळी पोचला नसल्याबद्दल "आयटीसी' कंपनीकडून तक्रार देण्यात आली. लोणावळा हद्दीत हा गुन्हा घडल्यामुळे ग्रामीण पोलिसांनी तपास सुरू केला. सुपा टोल नाका, तसेच पेट्रोलपंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या चेहऱ्यांवरून गुन्हेगार सराईत असल्याची खात्री पटली. त्यानंतर ग्रामीण पोलिसांची दोन पथके नगर आणि औरंगाबादला रवाना करण्यात आली. 26 सप्टेंबर रोजी पाचही गुन्हेगारांना मुद्देमालासह पकडण्यात आले.

सर्व आरोपी सराईत असून, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे रहिवासी आहेत. त्यांच्यावर दहा ते बारा गुन्हे दाखल आहेत. नांदगाव पेट्रोलपंप आणि सुपा टोल नाक्‍यावरील सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हेगारांना अटक करण्यात यश आले. तीन महिन्यांपूर्वी या गुन्ह्याचा कट रचला होता. गुन्हेगारांनी रांजणगाव, लोणावळादरम्यान रेकी केली होती. पुणे ग्रामीण जिल्हा अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळ्याच्या सहायक पोलिस निरीक्षक साधना पाटील, बालाजी गायकवाड, पोलिस हवालदार पी. एस. कांबळे, एस. ए. सावंत, एस. सी. ठोसर, जे. ए. दीक्षित, एम. ए. ठोंबरे, वाय. एच. जगताप आदींचा तपासात सहभाग होता.

Web Title: pune news crime