लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणारी टोळी जेरबंद 

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुटणारी टोळी जेरबंद 

पुणे - स्कोडा मोटारीतून लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नागरिकांना लुटणाऱ्या टोळीतील पाच सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 14 गुन्हे उघडकीस आणत सोन्याचे दागिने, लॅपटॉप असा सुमारे 15 लाख रुपयांचा ऐवज आणि दरोड्याचे साहित्य जप्त केले. गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने ही कारवाई केली. 

अशोक गणपत बनसोडे (वय 34, रा. गोंधळेनगर, हडपसर, मूळ लातूर), मोहसीन अयूब पठाण (27, रा. कौसरबाग, कोंढवा), अरबाज युनूस पठाण (26, रा. सय्यदनगर, हडपसर), मुकेश कांतिलाल चव्हाण (22, रा. बनकर कॉलनी, हडपसर) आणि निखिल रवींद्र बामणे (23, रा. जुनी वडारवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यांनी बंडगार्डन, येरवडा, हिंजवडी, भारती विद्यापीठ, शिवाजीनगर, हडपसर, खेड आणि विरार पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडल्याचे समोर आले आहे. आरोपींविरुद्ध यापूर्वी लातूर ग्रामीण, चतु:शृंगी आणि दिंडोशी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

आरोपी बनसोडे, चव्हाण आणि बामणे हे बलात्कार आणि विनयभंगाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना त्यांची आपसांत ओळख झाली. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर येथून स्कोडा मोटार चोरली. नंबरप्लेट बदलून आणि त्यावर इंग्रजीत आर्मी असे लिहून मोटारीचा वापर करून गुन्हे केले. 

फिर्यादी अमितकुमार त्यागी हे 23 नोव्हेंबरला पुणे स्टेशन येथून मुंबईला जाण्यासाठी मोटारीत बसले; परंतु मोटारीत सहप्रवासी म्हणून बसलेल्या आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून लुबाडले. दौंड येथील गणेश कांबळे हे 27 नोव्हेंबर रोजी हडपसर गाडीतळ येथे बसची वाट बघत थांबले होते. त्या वेळी आरोपींनी त्यांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने हडपसर ते सासवडदरम्यान चाकूचा धाक दाखवून लुबाडले. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त पंकज डहाणे आणि सहायक आयुक्‍त समीर शेख यांच्या सूचनेनुसार युनिट तीनचे वरिष्ठ निरीक्षक सीताराम मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com