पोलिसांनी मित्रांवर कारवाई केली म्हणून वाहनांची तोडफोड

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 19 जून 2017

रविवारी रात्रीचा वारजे माळवाडीतील रामनगर येथील घटना

वारजे माळवाडी : पोलिसांनी मित्रांवर कारवाई केली म्हणून मित्रांनी रामनगर येथे जाऊन वाहनांची तोडफोड केली आहे.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बाजीराव मोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "जुना जकात नाका येथे दगड मारल्याचा कारणावरून दोन तरुणांवर वारजे माळवाडी पोलिसांनी कारवाई केली होती. त्यामुळे, चिडलेल्या त्यांचे सात-आठ मित्र रविवारी रात्री दोन-तीन दुचाकीवरून रामनगर परिसरात आले. बांबू, कोयता, दगडांनी सात आठ वाहनांचे नुकसान केले.

रविवारी रात्री भारत पाकिस्तान मधील क्रिकेट सामना पाहण्यास नागरिक दंग होते. त्यावेळी अचानक आवाज आल्याने नागरिक घाबरले. गाड्यांवर बांबू, दगडाने त्यांचे नुकसान होत होते. यावेळी एकजण आपल्या गाडीला काही करू नये म्हणून गेला. तर त्याच्यावर कोयत्याचा वार केला पण त्याने तो चुकविला." घटनास्थळी पोलीस उपायुक्त डॉ.बसवराज तेली यांनी भेट दिली. 

नुकसान करणाऱ्यांवर कारवाई- मोळे
नागरिकांच्या वाहनांचे मालमत्ते नुकसान करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर योग्य कारवाई केली जाईल. 
- बाजीराव मोळे, पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाणे