पोलिसांच्या घरांसाठी आमदार राहुल कुल प्रयत्नशील : जानकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

पोलिसांच्या घरांसाठी विधानसभेतील विविध संसदीय आयुधे वापरून आमदार राहुल कुल यांनी निधीची तरतूद करून घेतली असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विकास खात्यांचे मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

दौंड - पोलिसांच्या घरांसाठी विधानसभेतील विविध संसदीय आयुधे वापरून आमदार राहुल कुल यांनी निधीची तरतूद करून घेतली असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विकास खात्यांचे मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाच येथील इमारत दुरुस्ती व अंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन जानकर यांच्या हस्ते झाले. या वेळी नगराध्यक्षा शीतल कटारिया, आमदार राहुल कुल, समादेशक श्रीकांत पाठक, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख ओमप्रकाश शेटे, सहायक समादेशक आर. जी. गायकवाड आदी उपस्थित होते. जानकर म्हणाले, "सरकार पोलिस बांधवांसाठी नवीन घरे बांधणे आणि जुन्या घरांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दौंडमधील राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाच व सात, नानवीज येथील पोलिस प्रशिक्षण केंद्र आणि राज्य राखीव पोलिस प्रशिक्षण केंद्रांमधील घरांची दुरुस्ती व राज्यात पोलिसांच्या घरांविषयी धोरण ठरविण्यासाठी आमदार कुल यांनी विधानसभेत चर्चा घडवून आणली आहे.' तालुक्‍यात एक हजार कोटी रुपयांचा निधी आणण्यात यश आल्याचे कुल यांनी या वेळी सांगितले.

राज्य राखीव पोलिस दलातील रस्ते व दुरुस्ती कामांसाठी 62 कोटी 31 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी गट पाच व सात येथील कामांसाठी एकूण आठ कोटी 19 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. उपनिरीक्षक डहाळे यांनी सूत्रसंचालन केले.