धोकादायक भागात डेंगीवर उपाययोजना

धोकादायक भागात डेंगीवर उपाययोजना

पुणे - डेंगीच्या उद्रेकाचा धोका असलेल्या भागात तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे घोले रस्ता, शिवाजीनगर आणि ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात डेंगीचे रुग्ण वाढल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. त्यामुळे या भागात डास नियंत्रणाच्या उपाययोजना प्राधान्याने हाती घेतल्या आहेत, अशी माहिती महापालिकेच्या कीटक विभागाचे प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांनी दिली. 

शहरात गेल्या वर्षभरात डेंगीचे एक हजार ६१५ रुग्ण आढळले आहेत. त्यातही गेल्या चार महिन्यांपासून डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. राज्यात सर्वाधिक डेंगीचे रुग्ण पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये असल्याची माहिती आरोग्य खात्याने जाहीर केली. या पार्श्‍वभूमीवर गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसामुळे पुन्हा डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढण्याचा धोका गृहीत धरून डास नियंत्रणाची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. 

याबाबत डॉ. बळिवंत म्हणाल्या, ‘‘चक्रीवादळाचा परिणाम म्हणून शहरात गेल्या आठवड्यात पावसाच्या सरी पडल्या. त्यामुळे साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होऊन डेंगीचे रुग्ण वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे डेंगीच्या रुग्णांची संख्या मोठी असलेल्या भागात डास नियंत्रणाचे काम हाती घेतले आहे.’’

शहरात गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत डेंगीच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. या महिन्यात ७० ते ८० रुग्णांना डेंगी झाल्याचे निदान झाले आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने आणि थंडीचा कडाका वाढत असल्याने डेंगीचा उद्रेक पुढील दोन महिन्यांमध्ये कमी होईल, अशी माहितीही तज्ज्ञांनी दिली.

उपचारासाठी प्लेटलेट्‌सचा ‘ताप’
डें  गीच्या उपचारांसाठी प्लेटलेट्‌सची मागणी वाढली असून, याचा पुरवठा करताना शहरातील रक्तपेढ्यांची दमछाक होत आहे, अशी माहिती पुढे आली आहे. 
शहरात गेल्या चार महिन्यांपासून डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यापैकी काही रुग्णांमध्ये उपचारांची गुंतागुंत वाढली. त्यातून त्यांना प्लेटलेट्‌स द्याव्या लागल्या, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढल्याने गेल्या दोन महिन्यांपासून प्लेटलेट्‌सची मागणी प्रचंड वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी रक्तदात्यांना रक्तदानाचे आवाहन करण्यात येत आहे. महाविद्यालये, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, समाजसेवी संस्था, विविध कार्यालये यांच्याशीही याबाबत संपर्क साधण्यात येत असल्याची माहिती विविध रक्तपेढ्यांमधून मिळाली.

प्लेटलेट्‌सच्या मागणीत वाढ झाली असली तरीही, ती मागणी पूर्ण करण्यात येत आहे. त्यात मोठा तुटवडा निर्माण झाला नाही, असेही काही रक्तपेढ्यांच्या रक्त संक्रमण अधिकाऱ्यांनी सांगितले. 

महिना      डेंगीचे रुग्ण
जानेवारी      ८
फेब्रुवारी     २
मार्च      ४
एप्रिल      ५
मे      ३
जून      ६
जुलै     ५८
ऑगस्ट     २३४
सप्टेंबर      २५१
ऑक्‍टोबर      ५२६
नोव्हेंबर      ४४८
डिसेंबर       ७०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com