सोसायट्या बनल्या डेंगीचे आगार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

पुणे - शहरांमधील सोसायट्याच डेंगी पसरणाऱ्या डासांचे मुख्य आगार बनल्या आहेत. शहरात पसरलेल्या ६५ टक्के डेंगीला सोसायट्या जबाबदार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे दोन हजार ८४९ सोसायट्यांना नोटीस बजावल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

पुणे - शहरांमधील सोसायट्याच डेंगी पसरणाऱ्या डासांचे मुख्य आगार बनल्या आहेत. शहरात पसरलेल्या ६५ टक्के डेंगीला सोसायट्या जबाबदार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे दोन हजार ८४९ सोसायट्यांना नोटीस बजावल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

शहरात गेल्या महिन्याभरापासून डेंगीच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पावसाच्या साचलेल्या स्वच्छ पाण्यात डेंगीचे डास अंडी घालतात. त्यामुळे अशी डासांची उत्पत्तीची स्थळे शोधून त्यांना नोटीस देण्याचा धडाका महापालिकेने हाती घेतला आहे. १९ जूनपासून या नोटिसा बजावल्या जात आहेत. त्याच वेळी डासांच्या उत्पत्तीची स्थळे नष्ट करून घेतली जात आहेत. चित्रपटगृहे, सरकारी कार्यालये, पोलिस स्टेशन, शासकीय कार्यालये, बांधकामांची ठिकाणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेंगीचे डास आढळल्याची माहिती पुढे येत होती. मात्र, त्यापैकी सर्वांत जास्त उद्रेकाचे ठिकाण शोधण्यासाठी महापालिकेने बजावलेल्या चार हजार ३४० नोटिसांचे विश्‍लेषण करण्यात आले. त्यापैकी ६४ टक्के म्हणजे २८४९ नोटीस सोसायट्यांना दिल्या आहेत. त्यातून सोसायट्यांमधून शहरात सर्वाधिक डेंगीचा प्रसार होत असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे, असे आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

शहरांमधील पोलिस स्टेशनपासून ते रुग्णालयापर्यंत आणि सरकारी कार्यालयांपासून ते महापालिकांच्या क्षेत्रीय कार्यालयापर्यंत सर्वत्र मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होत असल्याची राळ उठविली जात होती. पण, त्यातून नेमक्‍या कोणत्या घटकावर लक्ष केंद्रित केल्यानंतर शहरातील डेंगीचा उद्रेक नियंत्रणात येईल, याचे उत्तर मिळत नव्हते. त्यासाठी नोटिसांचे विश्‍लेषण करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

घोले रस्त्यावर सर्वाधिक नोटिसा
शहरातील नोटीस दिलेल्या आस्थापनाची महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमधून माहिती संकलित करण्यात आली. त्यात सर्वाधिक नोटिसा घोले रस्ता क्षेत्रीय कार्यालयास बजावल्याचे स्पष्ट झाले. तेथे बजावलेल्या ४७१ पैकी २९५ नोटिसा सोसायट्यांना बजावल्या आहेत. त्या खालोखाल ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय (४१८) आणि हडपसर (४००) क्षेत्रीय कार्यालयांमधील आस्थापनांना नोटिसा दिल्या आहेत. 
शहरात आतापर्यंत चार हजार ३४० आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. डेंगीच्या नियंत्रणासाठी आवश्‍यक त्या सर्व उपाययोजना वेगाने सुरू आहेत. त्या उपाययोजनांबरोबरच नागरिकांनी आपल्या घराच्या, कार्यालयाच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. त्यातून लवकर डेंगी नियंत्रणात येईल. 
- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.

जलतरण तलाव आणि क्‍लब हाउस यावर बिल्डरचा ताबा आहे. तो सोसायटीकडे वर्ग केलेला नाही. त्याची देखभाल नियमितपणे होत नसल्याने पावसाचे पाणी जलतरण तलावात साचून तेथे डास झाले आहेत. त्याला सोसायटीला जबाबदार कसे धरणार. महापालिकेने ही नोटीस बिल्डरला दिली पाहिजे. 
- श्रेयस देशपांडे, सचिव, रिद्धी-सिद्धी पॅराडाईज सोसायटी, सिंहगड रस्ता

यांना बजावल्या नोटिसा
एकूण नोटिसा  ४३४०
सोसायट्या २८४९
शासकीय, निमशासकीय कार्यालये ३९५
बांधकाम २३९
भंगार १८६
टायर २२९
मॉल ५१
मल्टिप्लेक्‍स ३०
बेसमेंट ११२
इतर व्यावसायिक २४९