'योग्य जीवनशैलीतून गाठा शंभरी'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

काठीचा अाधार न घेता चालणे
दररोज सकाळी सहा वाजता उठणे, चालणे, विशेष म्हणजे वयाच्या शंभरीतही अग्रवाल हे काठीचा आधार न घेता चालतात. सकाळी आणि सायंकाळी जेवण आणि रात्री झोपताना एक ग्लास दूध, असा त्यांचा दिनक्रम असतो.

पुणे - ‘‘योग्य जीवनशैली असली, की वयाची शंभरी सहज पार करता येते. तीदेखील निरोगी आणि ठणठणीत राहून. सकाळी चालणे, योग्य वेळी आहार आणि पुरेशी झोप घेतली, की तुमचे आरोग्य निरोगी राहणारच!’’ असा आरोग्यदायी कानमंत्र वयाची शंभरी पार केलेल्या आणि अजूनही ठणठणीत असणाऱ्या देवराज अग्रवाल यांनी दिला.  

मूळचे पंजाबच्या लुधियानाजवळील बलिओन गावच्या अग्रवाल यांनी लुधियानाच्या आर्या हायस्कूलमधून दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुन्हा गावी जाऊन काम केले. त्याकाळी भारत- पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. अग्रवाल यांनी लाहोर येथील ‘आयएमसीए’ संस्थेतून ‘बुक कीपिंग आणि शॉर्टहॅण्ड टायपिंग’ हा कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्यांना संरक्षण विभागात लिपिकपदाची नोकरी मिळाली. आपल्या ३४ वर्षांच्या कार्यकाळात अग्रवाल यांनी अंबाला, देहरादून, अलाहाबाद, कानपूर, पटना, भोपाल अशा विविध ठिकाणी काम केले. चार मुले, अकरा नातवंडे आणि पंधरा पणतू असा गोतावळा असलेले अग्रवाल आपल्या आरोग्याबाबतही तितकेच जागरूक असतात.

अग्रवाल सांगतात, ‘‘आयुष्याचा हा टप्पा गाठताना अनेक चांगले- वाईट प्रसंग अनुभवले. वाईट प्रसंगांमध्ये तणाव यायचा; पण तो फार काळ नसायचा. कुटुंबीयांच्या सोबत तो ताणही फारसा जाणवत नसे. हल्लीची पिढी मात्र कुटुंबापासून दूर होत असून, सतत तणावग्रस्त असते. नेहमीच धावपळ, चिंता यामुळे त्यांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच, शिवाय कुटुंबातील सुसंवादातही दरी निर्माण होते. तरुण पिढीने नेहमीच्या धावपळीतून थोडा वेळ स्वतःसाठी, आपल्या कुटुंबीयांसाठी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या आरोग्यासाठी दिला पाहिजे.’’