विकृतीचे व्हावे विसर्जन...

सुनील माळी
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या दोन अंगांपैकी दहा-बारा दिवस साजऱ्या होणाऱ्या उत्सवात हळूहळू का होईना, पण काळानुरूप स्वागतार्ह बदल होत चालला असताना मिरवणूक हे दुसरे अंग मात्र विकृतीकडून अधिक विकृतीकडे चालले आहे. या विकृतीचा अंत दोन प्रकारे होऊ शकतो... एक म्हणजे तिला कंटाळू लागलेले पुणेकर या थिल्लरबाजीकडे पाठ फिरवतील आणि ती आटोक्‍यात येईल आणि दुसरा म्हणजे कधीकाळी उदयाला येणाऱ्या एखाद्या सर्वमान्य नेतृत्वाकडून किंवा न्यायालयाकडून पुरेशी बंधने घातली गेल्याने ती थांबेल...

सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये सामाजिक जाणीव वाढत असल्याची सुचिन्हे एका बाजूने दिसत आहेत, मात्र पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा गेल्या काही दशकांमध्ये प्रवास हा विकृतीकडून अधिक विकृतीकडे असा होत चाललेला आहे. अठ्ठावीस तासांपर्यंत लांबलेली, मानाच्या मंडळांनी लक्ष्मी रस्त्यावर पाच-सहा तासांपर्यंतचा वेळ खाल्लेली, कसलेही नियंत्रण नसलेली, झुंडशाहीपुढे पोलिस दलाने नमते घेतल्याने ठरलेले माफक नियमही पायदळी तुडवण्यात धन्यता मानणारी, दारूच्या उग्र वासाने वेढलेली, हृदयाचे ठोके चुकतील आणि कानाचे पडदे फाटतील अशा कर्कश ‘डीजे’चा प्रादुर्भाव असलेली, त्याच त्या दोन-तीन रस्त्यांचा मंडळांचा हट्ट पुरवणारी अशी ही मिरवणूक आपण गेली अनेक दशके सहन करीत आहोत. या वर्षीचा सुदैवाचा भाग असा की याविरोधात प्रत्यक्ष भेटीपासून ते सोशल मीडियापासून बोलणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याचे दिसते आहे.

या मिरवणुकीतील किती प्रकारच्या विकृती असाव्यात...? 
एक तर दहा दिवस राबून मंडळाचे काम करणारे कार्यकर्ते आणि शेवटच्या दिवशी मंडळापुढे नाचणारे ‘कार्यकर्ते’ हे एक नसतात. मिरवणुकीतील या ‘कार्यकर्त्यां’ना आपण कोणत्या मंडळापुढे नाचतो आहोत, याचे काहीही सोयरसुतक नसते तर त्यांना ‘आला बाबूराव’, ‘पप्पी दे पारूला’ अशा उडत्या, अभिरूचिहीन ठेकेदार गाण्यांवर नाचायला जागा हवी असते.

मिरवणुकीच्या आदल्या दिवशी पुण्याच्या रस्त्यांवरून फिरलो असता दारूच्या दुकानांमधून मिरवणुकीसाठी पुरेसा ‘स्टॉक’ करून ठेवण्यासाठी तोबा गर्दी झाल्याचे दिसून आले. ‘उत्सव हा पावित्र्याचे, मांगल्याचे वगैरे प्रतीक म्हणून मानले जाते आणि गणरायाला निरोपही तेच पावित्र्य राखून द्यायला हवे’, वगैरेवगैरे गोष्टी या एकतर जाहीरपणे बोलताना किंवा फार झाले तर वृत्तपत्रांतील बातम्यांमध्ये शोभतात. याला काही चांगले, सन्माननीय अपवाद वगळता प्रत्यक्षात डोळे उघडे ठेवून फिरणाऱ्या कोणालाही यातील ढोंगबाजी ठिकठिकाणी दिसेल. गणपतीच्या गाड्याच्या खालच्या बाजूला ठेवलेली बाटली थोड्याथोड्या वेळाने तोंडाला लावणारे तरुण आपण पाहिले आहेतच ना? बेधुंद नाचणाऱ्यांच्या फौजा जेवढ्या अधिक तेवढ्या त्या मंडळाच्या भाऊची कॉलर अधिक ताठ.