हिरवागार दिवेघाट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जुलै 2017

पुणेः पावसामुळे दिवेघाटात हिरवाई पसरली आहे. पावसात भिजण्याचा आनंद घेण्याबरोबरच थंडगार हवा अनुभवण्यासाठी, घाटसौंदर्य तसेच ऐतिहासिक मस्तानी तलावाचे विलोभनीय दृश्‍य पाहण्यासाठी पर्यटकांनी दिवेघाट चांगलाच फुलून गेला आहे.

पुणेः पावसामुळे दिवेघाटात हिरवाई पसरली आहे. पावसात भिजण्याचा आनंद घेण्याबरोबरच थंडगार हवा अनुभवण्यासाठी, घाटसौंदर्य तसेच ऐतिहासिक मस्तानी तलावाचे विलोभनीय दृश्‍य पाहण्यासाठी पर्यटकांनी दिवेघाट चांगलाच फुलून गेला आहे.

बाजीराव- मस्तानीच्या प्रेमाचे प्रतीक असणाऱ्या ऐतिहासिक मस्तानी तलावाचे सान्निध्य लाभलेला दिवेघाट पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरला आहे. हिरव्यागार वातावरणात हा तलाव अधिक आकर्षक दिसत आहे. घाटरस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या हिरव्या झाडीतून नागमोडी रस्त्याने प्रवास करताना मनोहर दृश्‍य दिसते. याच्या जोडीला उंच घाटातला अंगाला झोंबणारा थंडगार वारा प्रवाशांना उल्हसित करतो. एरवीही शहरातील धकाधकीच्या दैनंदिनीत त्रस्त झालेलेही कुटुंबकबिल्यासह गावाकडे जाताना आवर्जून घाटात थांबून घाटनिसर्गाचा आनंद घेत आहेत. सासवडकडे जाताना घाटाच्या शेवटच्या वळणावर पर्यटकांची दिवसभर गर्दी दिसून येते. या उंचीवरून खाली दऱ्यांच्या कुशीत विसावलेल्या, हिरव्या झाडीत चमकणाऱ्या ऐतिहासिक चंदेरी मस्तानी तलावाचे विलोभनीय दृश्‍य पाहण्यासाठी व या पार्श्‍वभूमीवर छायाचित्रे काढून घेण्यासाठी गर्दी होत आहे. कट्ट्यांवर बसून मक्‍याची कणसे, पॉपकॉर्न, भडंग खाण्याचा आनंदही लुटला जात आहे. जेजुरी, सासवड, मोरगाव, पंढरपूर, नारायणपूर, केतकावळ्याचा बालाजी येथे देवदर्शनासाठी निघालेले भाविकही घाटात थांबून निसर्गाचा आनंद घेत आहेत. प्रेमीयुगले या गर्दीपासून थोड्या अंतरावरील दरीकडील बाजूला थांबून निसर्ग अनुभवत आहेत. घाटात न थांबणाऱ्या एसटी बसमधील प्रवासीही खिडकीतून मस्तानी तलाव, खोल दऱ्यांची भेदकता पाहता यावी म्हणून प्रयत्न करताना दिसतात. या घाटाचे चांगले सुशोभीकरण केले, डागडुजी केली, स्वच्छता ठेवली तर पर्यटक अधिक संख्येने घाटात येतील, अशी अपेक्षा पुरंदर हवेली शिवसेनेचे अध्यक्ष संदीप मोडक, माजी पंचायत समिती सदस्या नंदाताई मोडक, उरुळी देवाचीच्या माजी सरपंच नीता भाडळे, कचरा डेपो हटाव संघर्ष समितीचे अध्यक्ष भगवान भाडळे यांनी व्यक्त केली.