तिघांच्या बळीनंतर पालिकेला जाग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

अपघाताला सव्वा महिना पूर्ण; संपूर्ण बाणेर रस्ता उंच दुभाजकांच्या प्रतीक्षेत

पुणे - दुभाजकावर मोटार चढून महिलेसह मुलीचा मृत्यू झाल्यावर महापालिकेला जाग आली असून, या अपघातानंतर सुमारे सव्वा महिन्याने संबंधित अपघातस्थळी तीन फूट उंचीचे दुभाजक बसविण्यात आले आहेत; मात्र संपूर्ण बाणेर रस्ता अजूनही उंच दुभाजकांच्या प्रतीक्षेत आहे. 

अपघाताला सव्वा महिना पूर्ण; संपूर्ण बाणेर रस्ता उंच दुभाजकांच्या प्रतीक्षेत

पुणे - दुभाजकावर मोटार चढून महिलेसह मुलीचा मृत्यू झाल्यावर महापालिकेला जाग आली असून, या अपघातानंतर सुमारे सव्वा महिन्याने संबंधित अपघातस्थळी तीन फूट उंचीचे दुभाजक बसविण्यात आले आहेत; मात्र संपूर्ण बाणेर रस्ता अजूनही उंच दुभाजकांच्या प्रतीक्षेत आहे. 

बाणेर गावठाणाजवळ १७ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता रस्ता ओलांडत असताना मोटार दुभाजकाव चढून झालेल्या अपघातात पूजा विश्‍वकर्मा (वय २५) आणि इशा विश्‍वकर्मा (वय ३) यांचा मृत्यू झाला होता. अन्य एक असे तिघे जण या अपघातात मृत्युमुखी पडले होते. या अपघातानंतर शहरातील दुभाजकांच्या उंचीचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. शहरातील सर्व दुभाजकांची उंची वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने जाहीर केला आहे. बाणेर रस्त्यावर बीआरटी वाहतूक व्यवस्थेची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील दुभाजकांची उंची वाढविता येत नसल्याची भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली होती; परंतु बीआरटीचे काम सुरू होईपर्यंत दुभाजक सुरक्षित उंचीचे असले पाहिजेत, असा आग्रह स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर आणि ज्योती कळमकर यांनी प्रशासनाकडे धरला. त्यासाठी पाठपुरावा केल्यावर अपघातस्थळी आणि परिसरात सुमारे दोनशे मीटर लांबीचे आणि तीन फूट उंचीचे दुभाजक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याला येत्या दोन दिवसांत रंग दिला जाईल, असे बालवडकर यांनी सांगितले. 

बाणेर रस्त्यावरील भरधाव वाहतूक लक्षात घेता येता या रस्त्यावर ठिकठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठीही सुविधा निर्माण करून देण्याचा आग्रहही स्थानिक नगरसेवकांनी धरला आहे. त्यानुसार प्रशासनाने दोन ठिकाणी पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्याची सुविधा केली असून, दोन ठिकाणी वाहतुकीचा वेग कमी करण्यासाठी रंबलर्स टाकले आहेत. 

बाणेर रस्त्यावर अपघात झाला, त्याच ठिकाणी दुभाजकांची उंची वाढवून उपयोग नाही, तर ग्रीनपार्क हॉटेल ते बाह्यवळण रस्त्यापर्यंतच्या बाणेर रस्त्यावर सर्वत्र तीन फूट उंचीचे दुभाजक बसविणे आवश्‍यक आहे. तसेच ठराविक अंतरावर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सुविधाही हवी आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
- अमोल बालवडकर, नगरसेवक