दिवाळीचा फराळ झाला "गोड'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

गतवर्षीच्या तुलनेत वस्तूंच्या किमती कमी झाल्याने खर्चात बचत

गतवर्षीच्या तुलनेत वस्तूंच्या किमती कमी झाल्याने खर्चात बचत
पुणे - 'दिवाळी म्हटले की फराळ आलाच. त्यासाठी आवश्‍यक वस्तूंचे भाव कमी झाले ही समाधानाची गोष्ट आहे. यातून जी बचत होईल, ती दुसऱ्या कामासाठी उपयोगी पडू शकते...'' हे बोल आहेत हडपसर येथील गृहिणी छाया कुंजीर यांचे. फराळासाठी आवश्‍यक असलेल्या डाळी, कडधान्य, रवा, मैदा, बेसन, खाद्यतेल, तूप आदी वस्तूंचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याने यंदा गृहिणींना फराळावर जास्त खर्च करावा लागणार नाही.

लाडू, करंजी, चिवडा, शंकरपाळी, चकली असे फराळाचे विविध पदार्थ तयार करण्यासाठी आवश्‍यक कच्चा मालाची मागणी दिवाळीपूर्वी वाढते. किराणा भुसार मालाच्या घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांकडे गर्दी होऊ लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा या वस्तूंचे भाव तुलनेने कमी असल्याचा फायदा ग्राहकांना होईल. गेल्या वर्षी डाळींचे भाव तेजीत होते. या वर्षी हरभराडाळ, तूरडाळ, उडीदडाळ यांच्या भावांत गेल्या वर्षीच्या तुलनेत 40 ते 50 टक्के घट झाली आहे.

मिलची संख्या वाढल्याचा फायदा
गव्हाचे उत्पादन चांगले झाल्याने रवा, मैदा, आटा यांचे भाव स्थिर राहिल्याचे सुरेंद्र अग्रवाल यांनी नमूद केले. दिवाळीत या वस्तूंची मागणी चार ते पाच पट वाढते. या वर्षी उत्पादन चांगले झाले आहे. पुणे जिल्ह्यात या वस्तूंचे उत्पादन घेणाऱ्या मिलची संख्या वाढली असल्याचा फायदा पुण्याच्या बाजारपेठेला होत असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.

शेंगदाणाही स्वस्त
शेंगदाण्याचे भाव 25 टक्के कमी असल्याचे अनिल लुंकड यांनी नमूद केले. या वर्षी त्याचा प्रति किलोचा भाव 60 ते 80 रुपये इतका आहे. शेंगदाणा प्रति किलो 40 रुपये आहे.

- डाळींचे भाव कमी झाल्याचा परिणाम भाजकी डाळ आणि बेसन यांच्या भावांवर झाला आहे.
- गोटा खोबरे आणि साखर यांचे भाव थोडे वधारले.
- खाद्यतेलाच्या डब्याचा भाव ( 15 लिटर) 40 रुपयांनी; तर तुपाचा भाव 30 रुपयांनी कमी झाले आहेत.

गेल्या वर्षी उत्पादन कमी असल्याने कडधान्य आणि डाळींचे भाव वधारले होते. बहुतेक डाळींचे किरकोळ विक्रीचे भाव हे (प्रति किलो) शंभर रुपयांच्या पुढे होते. या वर्षी उत्पादन चांगले झाल्याने डाळींचे भाव उतरले आहेत. घाऊक बाजारात तूरडाळीचे प्रति किलोचा भाव 62 ते 67 रुपये, हरभराडाळीचा भाव 65 ते 75 रुपये, उडीदडाळीचा भाव 65 ते 70 रुपये इतका आहे.
- जितेंद्र नहार, व्यापारी

गेल्या वर्षी भाजक्‍या डाळीचा प्रति किलोचा भाव 140 ते 150 रुपये होता. तो या वर्षी 85 ते 95 रुपये इतका आहे. पोह्याच्या भावात प्रति किलोमागे पाच रुपयांचा फरक पडला आहे. मका पोह्याचे भाव मात्र स्थिर राहिले आहेत. बेसनाचे भावही गेल्यावर्षीच्या तुलनेत 40 ते 45 रुपयांनी कमी आहेत.
- कांतिलाल गुंदेचा, व्यापारी

काही वस्तूंचे तुलनात्मक भाव (प्रति किलो) 2016 आणि 2017
तूरडाळ : 125 रुपये आणि 80 रुपये
हरभराडाळ : 140 रुपये आणि 80 रुपये
उडीदडाळ : 110 रुपये आणि 70 रुपये
भाजकी डाळ : 150 रुपये आणि 95 रुपये
पोहा : 45 रुपये आणि 40 रुपये
बेसन : 150 रुपये आणि 90 रुपये

Web Title: pune news diwali faral