दीपोत्सवाच्या पर्वाने फुलला आनंद..! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

पुणे - आकाशाचा निळा गाभारा चांदणदीपांनी बहरू लागला आहे. अंगणांत-उंबरठ्यांवर रांगोळ्यांची नक्षी उमलू लागली आणि झिरमिरत्या दिव्यांचे पिवळट-केशरी रंगांचे किरण अंधकार दूर करून नव्या-तेजस्वी प्रकाशवाटेने निघालेले आहेत... अशावेळी दीपतेज आसमंतात उजेडाचा प्रसन्न उत्सव साजरा करीत आले आहे. 

खरे तर, एव्हाना थंडीचा हलका अत्तरस्पर्श अश्विनीची चाहूल जागी करीत येतो; पण यंदा अजूनही पाऊसच माघारी वळलेला नाही. दुष्काळाच्या झळा अनुभवलेल्या महाराष्ट्राला तृप्त करीत यंदाची दिवाळी आली आहे, असे म्हणता येईल. पिकाबरोबरच आनंदाचाही मनस्वी फुलून आलेला आहे हा दीपमहोत्सव. 

आपल्या आतील-बाहेरील अंधार दूर करणारी दिवाळी आली आहे. आज धनत्रयोदशीला धनाची, आरोग्यधनाचीही पूजा करायची असते. धणे व गूळ यांच्या प्रसाद यासाठीच तर असतो. आजपासूनचे सहा दिवस "आनंदी दिवस' म्हणून पंचागात सांगितलेले दिसतील. या दिवाळीचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, या वेळी एकही दिवस भाकड नाही. गेल्या वर्षभरात देशाच्या सीमेवर शत्रूच्या कुरघोड्या वाढल्या, देशांतर्गत मंदी, महागाई यामुळे त्रस्तपण वाट्याला आले. मात्र, ही दिवाळी आनंद घेऊन येणारी ठरणार आहे. पाऊस चांगला झाला आहे, पीक चांगले आले आहे, कुशल हातांना काम मिळू लागले आहे, स्टार्ट अप पुन्हा गती घेऊ लागले आहेत. साहजिकच खऱ्या अर्थाने आजपासून आनंदोत्सव सुरू झाला आहे. 

यंदाच्या दिवाळीत भाकड दिवस नाही, तसेच, आपल्या आसपास ज्यांच्या आयुष्यात दिवसच्या दिवस भाकड जाताहेत, त्यांच्या जीवनात एक आशादीप आपण उजळू शकू का? ज्यांची घरे अभावाची, त्यांच्या जीवनात सद्‌भावाने डोकावता येईल का? अभावग्रस्तांना हात देऊन आपणच अंतर्बाह्य उजळून निघण्याचा प्रयत्न करणार का? सुंदर जगात जगण्याचा पर्याय तुमच्या हाती आहे. 

जगण्याला सुंदर अर्थ देणारी वाट तुमच्यासमोर आहे, आपण फक्त त्यावरून चालायचे. 

दिवाळी म्हणजे आनंद. दिवाळी म्हणजे उत्साह. दिवाळी म्हणजे नानाविध रंग. दिवाळी म्हणजे आतषबाजी आणि प्रकाशाची कारंजी आणि उल्हासाचा उत्सव आणि चंगळ. एकीकडे आपली चंगळ सुरू असते आणि त्याचवेळी थोड्या पलीकडे चणचण असते. आपण पणत्यांमधून तेल जाळतो आणि पलीकडे खाद्यपदार्थ करण्यासाठीही तेल नसते. आपण नव्या कपड्यात मित्रांना भेटतो आणि पलीकडे जुन्या कपड्यातही शरीरे लपवता येत नसतात. ही आठवण देतोय, म्हणजे आपण सणच साजरा करायचा नाही का? अजिबात असे वाटून घेऊ नका. सणाचा आनंद जरूर लुटला पाहिजे; पण त्याचवेळी आपल्या आनंदात अभावग्रस्तांना सामावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. ज्यांची आयुष्ये भाकड जात आहेत, त्यांच्या जीवनात काही ओलावा आणण्याचा विचार केला, तर दिवाळीचे दिवस असतील, सर्वांत आनंदाचे, प्रकाशाचे गाणे गाणारे. तुमचे अंतर्बाह्य उजळणारे. 

Web Title: pune news diwali festival