देवदर्शनासह अविट गाण्यांचा आनंद लुटला 

देवदर्शनासह अविट गाण्यांचा आनंद लुटला 

पुणे - रेडिओवरील नरकासुराच्या वधाचे कीर्तन, ब्राह्म मुहूर्तावर बालगोपाळांसहित कुटुंबीयांचे अभ्यंगस्नान झाल्यावर देवादिकांनाही तेल-उटणे लावून गंध-फुलांनी झालेल्या षोडशोपचार पूजेनंतर दाखविण्यात आलेला फराळाचा नैवेद्य आणि फोडण्यात आलेले फटाके. सामाजिक संस्थांच्या दिवाळी पहाट कार्यक्रमांत स्वरमयी गाण्यांच्या रंगलेल्या मैफिली आणि देवदर्शनसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांनी उत्साहात नरक चतुर्दशीचा दिवस साजरा केला. 

आश्‍विन वद्य चतुर्दशीला नरक चतुर्दशीचा आनंद लुटत अनेकांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. विशेषतः व्हॉट्‌सऍप, ट्‌विटर, फेसबुकवर फिरणारे शुभेच्छांचे वर्षाव. मठ-मंदिरांतील कीर्तने. चित्रपटगृहांमध्ये तरुणांनी केलेली गर्दी. तर, आबाल वृद्धांसहित बालगोपाळांनीही दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थिती लावली. समधुर गाण्यांचा आणि कथक नृत्यातील अदाकारींचा आनंद लुटला. 

अभ्यंगस्नानानंतर फराळ करून अनेकांनी कसबा गणपती मंदिर, सारसबागेतील तळ्यातला गणपती, तांबडी जोगेश्‍वरी मंदिर अशा मंदिरांमध्ये, तसेच मठांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले. काहींनी तर हॉटेलमध्ये मिष्ठान्न भोजनावर ताव मारला. सुटीचा आनंद घेणाऱ्या नागरिकांनी हॉटेल्स गजबजून गेली होती. शनिवारवाड्यासमोरील प्रांगणात सर्वोत्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित स्वरमयी दिवाळी पहाट या कार्यक्रमात कथक नृत्यांगना शर्वरी जमेनीस यांनी नृत्याच्या अदाकारीतून रसिक श्रोत्यांची मने जिंकली. जमेनीस आणि त्यांच्या सहकारी नृत्यांगनांनी "मोह पनघट पे नंदलाल', "मुरली मनोहर कृष्ण कन्हैया', "मोहे रंग दो लाल', "आयी होली आयी सब रंग लाई' या गीतांवर नृत्यातील अदाकारी सादर केली. मधुराणी गोखले प्रभूलकर यांनी सूत्रसंचालन केले. गायक राजेश दातार उपस्थित होते. दातार म्हणाले, ""ट्रस्टतर्फे दरवर्षी दिवाळीत शास्त्रीय संगीतावर आधारित गायन तसेच कथक नृत्याचे कार्यक्रम आयोजित करतो. या निमित्ताने आपल्या अभिजात संगीताचा आस्वादही नागरिकांना घेता येतो.'' 

दरवर्षी दिवाळीत केंद्र व राज्य सरकार, तसेच सामाजिक संस्थांच्या प्रदूषणविरहित दिवाळी साजरी करण्याच्या आवाहनाला पुणेकरांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे नरक चतुदर्शीला पाहायला मिळाले. पहाटे फटाके फोडण्याचे प्रमाणही अत्यल्प होते. फटाके फोडण्याऐवजी अनेकांनी सूमधुर संगीत ऐकण्याचा आनंद घेतला. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित राहणे पसंत केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com