सराफी बाजारात संमिश्र वातावरण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

पुणे - नोटाबंदी, वस्तू व सेवाकर (जीएसटी) यांच्या अंमलबजावणीनंतर अर्थव्यवस्थेचा वेग मंदावल्याचा फटका सराफा बाजारालाही बसला. दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीला मौल्यवान दागिने व सोनेविक्रीचे चित्र गेल्या वर्षीसारखेच दिसत होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत विक्रीत फारशी वाढ झाली नसल्याची चर्चा सराफ बाजारात होती. काहींनी मात्र खरेदीसाठी परिस्थिती अनुकूल होत असल्याची प्रतिक्रिया नोंदविली. 

धनत्रयोदशीला सोने-चांदी व हिऱ्याचे दागिने घेण्याची प्रथा आपल्याकडे आहे. त्यामुळे सकाळपासूनच सराफी दुकानांमधून ग्राहक येत होते; पण जीएसटीचे मळभ अजूनही लोकांच्या मनातून निघालेले नसल्याचे जाणवत होते. त्यामुळे सोने व सोन्याचे दागिने खरेदीतही अपेक्षित वेग दिसला नाही. सायंकाळच्या टप्प्यात ग्राहकांची संख्या वाढताना दिसली. 

पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कमॉडिटी तज्ज्ञ अमित मोडक म्हणाले, की धनत्रयोदशीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग ऍक्‍टचे (पीएमएलए) सावट नसल्याने ग्राहक मनावर दडपण न ठेवता सोने खरेदी करू शकले. गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास त्याच भावात सोने उपलब्ध होते. फक्त व्हॅट व जीएसटीमधील दर फरक ग्राहकांना बोचरा वाटत होता. ग्राहकांचा कल मुहूर्तासाठी चोख सोने व दिवाळीचा सण म्हणून तयार दागिने या दोन्हींकडे होता. 2016 च्या तुलनेत सुमारे तेवढीच विक्री या वर्षी धनत्रयोदशीला दिसली. 

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, की या वर्षीची धनत्रयोदशी सकारात्मक वाटली. आजचा मुहूर्त दुपारी 2:30 नंतर सुरू झाला आणि जसजसा दिवस पुढे गेला तसतसा चांगला प्रतिसाद मिळत गेला. मुख्य म्हणजे गुंतवणूकदार आणि खरेदीदार या दोघांसाठीही सध्याची परिस्थिती अनुकूल आहे. "पीएमएलए'मध्ये झालेल्या सुधारणेमुळे खरेदीला अधिक प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या उत्सवी काळातील व्यवसाय गतवर्षीच्या तुलनेत 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढेल, अशी आशा आहे.