दौंड: अन् डीएमयू वेळेवर धावली

प्रफुल्ल भंडारी
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

सलग दोन दिवस विलंबाने धावणारी डीएमयूचे आज चक्क वेळेवर आगमन होणे, डीएमयू साठी दौंड रेले स्थानकावर फलाट उपलब्ध होणे आणि निर्धारित वेळेवर पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याने प्रवाशांना सुखद धक्का बसला.

दौंड : रेल्वे प्रवाशांच्या वाढत्या संतापाची दखल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्यानंतर आज बारामती-दौंड-पुणे डिझेल मल्टिपल यूनिट (डीएमयू) दोन महिन्यानंतर चक्क वेळेवर धावली. 

सलग दोन दिवस विलंबाने धावणारी डीएमयूचे आज चक्क वेळेवर आगमन होणे, डीएमयू साठी दौंड रेले स्थानकावर फलाट उपलब्ध होणे आणि निर्धारित वेळेवर पुण्याच्या दिशेने रवाना झाल्याने प्रवाशांना सुखद धक्का बसला.

दौंड रेल्वे स्थानक येथे आज (ता. ५) डीएमयू (गाडी क्रमांक ७१४०२) सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी दाखल होऊन निर्धारित वेळेवर सकाळी ८  वाजून २५  मिनिटांनी पुण्याच्या दिशेने रवाना झाली. 

डीएमयू दौंड रेल्वे स्थानकावर दाखल होण्यापूर्वी व नंतर एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्या उभ्या होत्या. परंतु प्रवाशांचा संताप आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने डीएमयू वेळेवर रवाना केली. आज रविवारची साप्ताहिक सुट्टी असल्याने विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची गर्दी नव्हती. 

मागील दोन महिन्यात फक्त दहा दिवस डीएमयू वेळेवर धावली असून शुक्रवारी (ता. ३) प्रवाशांनी विलंबाच्या निषेधार्थ डीएमयू दौंड रेल्वे स्थानकावर रोखून धरली होती. तर शनिवारी (ता. ४) साडेतीन तासांचा विलंब होऊन डीएमयू ने बारामती - दौंड - पुणे या 118 रेल्वे किलोमीटर प्रवासासाठी तब्बल पावणेसात तासांचा अवधी घेतला होता. 

मध्य रेल्वेच्या सोलापूर आणि पुणे विभागाचे रेल्वे व्यवस्थापकांनी सुपरफास्ट, एक्सप्रेस व डीएमयू च्या प्रवाशांमध्ये भेदभाव न करता आजप्रमाणे दररोज डीएमयू वेळेवर सोडण्याची माफक अपेक्षा प्रवासी व्यक्त करीत आहेत.