गर्भपात करण्यास नकार दिल्याने पुण्यातील डॉक्टरवर हल्ला

मिलिंद संधान
रविवार, 10 सप्टेंबर 2017

ती युवती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले.

नवी सांगवी : पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या एका  युवतीचा गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून पिंपळे गुरव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरवर अज्ञात टोळक्याने दवाखान्यात घुसून हल्ला केला. काल (शनिवार) रात्री ही घटना घडली असून, हल्लेखोरांनी डॉक्टरवर कोयत्याने वार केल्याचे सांगण्यात आले. 

पिंपळे गुरव येथे काटे पुरम चौकात डॉ. अमोल बिडकर यांचे रुग्णालय आहे. एका युवतीला घेऊन एकजण दोन आठवड्यांपूर्वी डॉ. बिडकर यांच्याकडे आला होता. ती युवती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. मात्र, 12 आठवड्यांपेक्षा जास्त दिवसांचा गर्भ असेल तर गर्भपात करणे बेकायदेशीर आहे. हा गर्भ 20 आठवड्यांचा असल्याने मी गर्भपात करू शकत नाही, असे सांगून डॉक्टरांनी गर्भपात करण्यास नकार दिला. 

डॉक्टरांबद्दल राग मनात धरून शनिवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास तिघेजण गाडीवरून बिडकर यांच्या दवाखान्याजवळ आले. एकजण दवाखान्याबाहेर थांबला. दुसरा डॉक्टरांच्या कॅबिनच्या दरवाजावर थांबला. आणि तिसऱ्याने आतमध्ये जाऊन डॉक्टरांवर कोयत्याने वार केले. डॉक्टरांच्या हातात मोबाईल होता. त्यांनी मोबाईलवर वार झेलल्याने मोबाईल फुटला आणि हाताचा पंजा वाचला. त्यांच्या बोटांना किरकोळ दुखापत झाली. नंतर खांद्यावर केलेला वार त्यांनी चुकवला. त्यामुळे ते बचावले. 

या हल्ल्याच्या निषेधार्थ सांगवी-पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशनचे सदस्य सांगवी पोलिस ठाण्यासमोर आज (रविवार) सकाळी जमले. या प्रकरणी आरोपींनी ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सांगवी-पिंपळे गुरव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
आता देताय की जाताय; मराठ्यांनी घातला सरकारचा गोंधळ
जमिनीच्या वादातून मुलांनीच केला पित्याचा खून
नोटबंदीने देशाची फसवणूक केली : पी. चिदंबरम
राजनाथसिंह काश्‍मीर दौऱ्यावर; मेहबूबा मुफ्तींशी चर्चा
'डेरा'च्या मुख्यालयात फटाक्‍यांचा अवैध कारखाना
स्पर्धा परीक्षांच्या पलीकडं... (संदीप वासलेकर)
मौजा चिंधीमालच्या भिकाऱ्यांचं काय करायचं ? (उत्तम कांबळे)