...आई शब्दशः "पीपल्स पर्सन' होती ! - डॉ. कुरूस कोयाजी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

वीस- बावीस वर्षे मला बानूबाईंचा सहवास मिळाला. त्यांच्यासोबत काम करणं नेहमीच आनंददायी अनुभव असे. मला त्या नेहमीच आईच्या काळजीने वागवत. मला आठवतं- बानूबाई आपल्या कामांच्या बाबतीत अतिशय कणखर होत्या. त्या तत्त्वांच्या बाबतीत तडजोड करत नसत. स्पष्टवक्‍त्या असल्या तरी त्यांचा कुणालाही राग येत नसे. त्या प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास करत. आंतरराष्ट्रीय परिषदांना जायच्या तेव्हा त्या त्याची अभ्यासपूर्ण तयारी करत. त्यांना सारं काही परिपूर्ण लागे. मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. "सकाळ'च्या पाठीशी त्या नेहमीच ठामपणे उभ्या राहिल्या. 
- प्रतापराव पवार, अध्यक्ष, सकाळ माध्यम समूह 

पुणे -  ""आईच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. मला आठवतं, तिला नुसतं काम करताना पाहून अनेकदा आपल्यालाच थकायला व्हायचं. किती तो उत्साह! किती ती ऊर्जा!... मी तीन वर्षांचा असताना आईने "एम.डी.' केलं होतं. नवं तंत्रज्ञान तिला खुणावायचं; पण दुसरीकडे सर्वसामान्यांच्या जगण्यात बदल घडवण्यासाठी तिचं मन व्यथितही व्हायचं. मला वाटतं ती आमच्यासाठी होती, त्याहीपेक्षा ती एक लोकांचं व्यक्तिमत्त्व होती... "द पीपल्स पर्सन'!'' अशा शब्दांत के.ई.एम. हॉस्पिटलचे संचालक आणि डॉ. बानू कोयाजी यांचे पुत्र डॉ. कुरूस कोयाजी यांनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा दिला. 

डॉ. बानू कोयाजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ "सकाळ प्रकाशन' आणि के.ई.एम. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात डॉ. प्रतिभा कुलकर्णीलिखित "बानूबाई' या आपल्या आईच्या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कुरूस कोयाजी यांच्या हस्ते रविवारी झाले. या वेळी "सकाळ माध्यम समूहा'चे अध्यक्ष प्रतापराव पवार, बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद पंडित, "सकाळ पेपर्स'चे माजी सरव्यवस्थापक के. मो. भिडे, सनदी लेखापाल दिलीप दीक्षित, के.ई.एम. रिसर्च सेंटरच्या संचालक डॉ. लैला गार्डा, "सकाळ प्रकाशन'च्या संपादक दीपाली चौधरी आदी उपस्थित होते. 

या वेळी पंडित म्हणाले, ""उण्यापुऱ्या चार खाटांच्या जागेतून बानूबाईंनी आपल्या उत्तुंग ध्यासाच्या बळावर के.ई.एम. हॉस्पिटलची उभारणी केली. त्या मला नेहमी म्हणत - "मी एक स्वप्नं पाहिलंय, ते मी पुढे नेऊ पाहतेय... तुम्हीही ते त्याच ऊर्मीने पूर्ण करण्यास माझ्यासोबत आहात?...' या एका आवाहनातून त्यांनी आमच्यासारखी अनेक माणसं त्यांच्या ध्येयाशी जोडून घेतली. भगवान बुद्धांनी सांगितलेला अष्टांग मार्ग बानूबाईंच्या उभ्या आयुष्याचाच मूलमंत्र होता!'' 

भिडे म्हणाले, ""बानूबाई माझ्या आयुष्यात एखाद्या देवदूतासारख्याच आल्या अन्‌ अखेरपर्यंत माझ्या मार्गदर्शक बनून राहिल्या. माणसांची उत्तम पारख असणारी त्यांच्यासारखी कुणी व्यक्ती विरळाच.'' 

गार्डा म्हणाल्या, ""केवळ एक स्त्री-रोगतज्ज्ञच नाहीत, तर बानूबाई एक उत्तम "लीडर' होत्या. "मूर्ती लहान पण कीर्ती महान' अशा त्या होत्या. वैद्यकीय व्यवसायाकडे त्या एक चळवळ म्हणून पाहायच्या.'' लेखिका मृणालिनी चितळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. 

बाईंना पारदर्शक व्यवहार आवडत... 
दीक्षित म्हणाले, ""माझे काम ऑडिटरचे असल्याने माझी भूमिका अनेकदा के.ई.एम.च्या कारभारातील उणिवांवर बोट ठेवण्याची होती; पण मला बानूबाईंनी पूर्ण मोकळीक दिली होती. त्या मला म्हणत - "तू ऑडिटर नसून फॅमिली डॉक्‍टरच आहेस. आम्ही चांगले काय करतो ते न सांगता तू आम्ही कुठे कमी पडतोय ते सांग...' बाईंना विश्‍वासार्हता आणि पारदर्शक व्यवहार आवडत.''