पुण्यातल्या सोवळ्याची पोल 'खोल'

dr medha khole and nirmala yadav
dr medha khole and nirmala yadav

पुणे : 'सोवळं मोडलं' म्हणून हवामान खात्याच्या संचालक डॉ. मेधा खोले यांनी निर्मला यादव (वय 50) यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून पुण्यात खळबळ उडाली आहे. यादव या डॉ. खोले यांच्या घरी स्वयंपाक करण्यासाठी येत होत्या. त्यांनी 'कुलकर्णी आडनाव सांगून आपल्याकडे नोकरी मिळवली आणि सुवासिनी बाई आहे असे सांगून आपल्या घरी स्वयंपाक केला,' अशी तक्रार डॉ. खोले यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री नोंदवली आहे. दरम्यान, यादव यांनी 'मी खोटे नाव सांगून नोकरी मिळवलेली नाही. डॉ. खोले यांनी माझ्या घरी येऊन मला मारहाण केली,' अशी तक्रार अभिरुची पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

हवामान खात्यात (इंडियन मेटिऑरॉलिजकल डिपार्टमेंट) संचालकासारख्या वरीष्ठ पदावर काम करणाऱया व्यक्तीने जातीच्या कारणावरून गरीब महिलेविरुद्ध पोलिसांत तक्रार द्यावी, ही घटना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक वर्तुळात धक्कादायक मानली जात आहे. जात लपवून सोवळे मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर डॉ. खोले यांनी गुन्हा दाखल केला आहे.

'मी 2016 ते 2017 या काळात चार वेळा स्वयंपाक केला आहे. त्या घरात वाद विवाद होतात. मी ब्राह्मण आहे की नाही, हा प्रश्न नाही. आजपर्यंत केलेल्या कामाचा मला एकही रुपयाही दिलेला नाही. सहा सप्टेंबरला डॉ. मेधा खोले माझ्याकडे आल्या. त्यांनी माझ्या घरी गोंधळ घातला. खोले यांनी घरात शिरण्यासाठी विदुला जोशी असे स्वतःचे खोटे नाव सांगितले,' असे निर्मला यादव यांनी अभिरुची पोलिस स्टेशन मध्ये सांगितले.

तू मराठा आहेस, खंडोबा, म्हसोबा असे तुझे रस्त्यावरचे देव आहेत. तू माझे घरातले देव बाटवले, असं म्हणत हातातली पर्स डॉ. मेधा खोले यांनी डोक्यात मारल्याचा आरोपही निर्मला यादव यांनी केला आहे. त्या पुढे म्हणाल्या, 'डॉ. मेधा खोले यांच्या घरी काम करण्यास गेले तेंव्हा मी फक्त निर्मला असे नाव सांगितले होते. कुलकर्णी असे नाव सांगितलेच नव्हते. यामुळे जात लपविण्याचा प्रश्नच नाही. उदरनिर्वाह करण्यासाठी काम करत आहे. परंतु, डॉ. मेधा खोले यांच्या घरी चार वेळा स्वयंपाक केला. या कामाचे पैसे मागितल्यानंतर त्यांना माझा राग आला. यामधूनच त्यांनी हे कृत्य केले असावे. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनीही त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हत्या.'

डॉ. मेधा खोले यांनी तक्रारीत म्हटले आहे, 'निर्मला यादव हिने तिचे नाव निर्मला कुलकर्णी असे असून ती सुवासिनी व जातीने ब्राह्मण असल्याची तोतयागिरी करून आमच्या घरी सोवळ्याच्या स्वयंपाकाचे काम करून त्या बदल्यात 15 ते 20 हजार रुपयांचा मोबदला स्वीकारला. आमच्या धार्मिक भावनांना धक्का पोहचवून आमची फसवणूक केली. याबाबतचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता त्यांनी माझ्या अंगावर धावून येऊन मला वाईट शिवीगाळ केली, म्हणून सदर महिलेविरुद्ध तक्रार आहे.'

माझ्या घरी दरवर्षी गौरी गणपती बसतात तसेच दरवर्षी माझ्या घरी माझ्या आई-वडिलांची श्राद्ध विधी असतो. त्यासाठी मला सोवळ्यामधील स्वयंपाक करणारी सुवासिनी (पती हयात असणारी) ब्राह्मण महिलेची आवश्यकता असते. मे 2016 मध्ये एक महिला निर्मला कुलकर्णी ही देवाच्या कार्यक्रमाचे स्वयंपाक करते, असे सांगत आमच्या घरी काम मागण्याकरता आली होती. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता ती ब्राह्मण समाजातील असून सुवासिन असल्याचे सांगितले. मे 2016 पासून आमच्या घरातील धार्मिक कार्यासाठी सोवळ्याचा स्वयंपाक करण्यासाठी आम्ही तिला बोलवत होतो, असे तक्रारीत म्हटले आहे.

डॉ. मेधा खोले यांनी तक्रारीमध्ये पुढे म्हटले आहे की, 'बुधवारी (ता. 6) सदर बाई ही ब्राह्मण नसल्याचे मला आमचे गुरुजी जोशी यांच्याकडून समजले. यामुळे धायरी येथे राहत असलेल्या निर्मलाच्या घरी जाऊन याबाबत विचारले असता तिने मला त्यात काय झाले असे उत्तर दिले. तेंव्हा मी त्यांना आमच्या घरी ब्राह्मण समाजातील सुवासिनी महिलेने केलेला स्वयंपाक चालतो व त्यामुळे तुम्ही असे खोटे सांगून आमची फसवणूक का केली? असे विचारले या कारणावरून चिडून तिने मला वाईट शिवीगाळ केली व माझ्याशी भांडण केले. माझ्या अंगावर धाऊन आली. निर्मला यादव हिने तिचे नाव निर्मला कुलकर्णी असून ती सुवासिनी व जातीने ब्राह्मण असल्याची तोतयागिरी करून आमच्या घरी सोवळ्याच्या स्वयंपाकाचे काम करून त्या बदल्यात 15 ते 20 हजार रुपयांचा मोबदला आमच्याकडून स्वीकारून आमच्या धार्मिक भावनांना धक्का पोहोचवून आमची फसवणूक केली, या कारणाने माझी तिच्या विरुद्ध तक्रार आहे.

खोले यांनी तक्रार मागे घ्यावी : ब्राम्हण महासंघ
सोवळ्याचा संबध शुचिर्भूतता आणि स्वच्छता याच्याशी त्याचा जातीशी काहीही संबंध नाही. ब्राह्मण महिला असल्याचा बनाव करून ब्राह्मण कुटुंबामध्ये सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यात एका महिलेवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. डॉ. मेधा खोले यांनी दाखल केलेला गुन्हा मागे घेवून हे प्रकरण सामोचाराने मिटवावे, अशी भूमिका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतली आहे.

सोवळ्याचा संबध शुचिर्भूतता आणि स्वच्छता याच्याशी असून, त्याचा जातीशी काहीही संबंध नाही तसेच फसवणुकीचा जो गुन्हा वयोवृद्ध महिलेविरोधात दाखल करण्यात आला त्यांच्या वयाचा विचार करता खोले यांनी तक्रार मागे घ्यावी आणि हे प्रकरण सामोपचाराने मिटवावे ही आमची भूमिका असल्याचे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी सांगितले.

दरम्यान, सोवळे मोडले म्हणून स्वयंपाकी महिलेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुरोगामी पुण्यातील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. उच्च शिक्षित असलेल्या डॉ. मेधा खोले व दहावी शिक्षण घेतलेल्या निर्मला यादव यांच्यामध्ये नेमके उच्चशिक्षित कोण? असा प्रश्न नेटिझन्स विचारू लागले आहेत. डॉ. मेधा खोले यांच्या घरासमोर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने निदर्शने केली जाणार आहेत.

मराठा बहुजन आजही शुद्रच...! देव बाटला...!- संभाजी ब्रिगेड
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी म्हटले आहे, की उच्चवर्णीय कुटूंबात एक गरीब वृद्ध महिला पोटासाठी घरकाम करत होती. घरातील सर्व स्वच्छता ठेवणे हेच तिचे काम... गणपती उत्सवाच्या काळात तिने घरातील सर्व घरकाम इमाने इतबारे केले. कधीही घरातल्या कोणत्याही वस्तूला वाईट हेतूने पाहिले अथवा उचलले नाही. फक्त गरज व पोटाची खळगी भरायची म्हणून तिने ब्राम्हण असल्याचे खोटे सांगितले. हिच तिची चुक. कारण उच्चवर्णिय व्यक्ती सुशिक्षित ब्राम्हण महिला अधिकारी असल्याने... त्यांना घरकाम व साफसफाई कामासाठी गरिब ब्राम्हण व्यक्ती'च पाहिजे होती. पोटासाठी हाताला काम पाहिजे म्हणून त्या गरीब (यादव) वृद्ध महिलेने ब्राम्हण असल्याचे खोटे सांगितले... परंतु आज त्यांना तिची जात कळाल्याने... व सोवळं बाटल्यांने... उच्चवर्णिय व्यक्ती सुशिक्षित ब्राम्हण महिला अधिकारी भडकल्या... कारण... हि महिला मराठा (यादव) असल्याने शुद्र आहे. शुद्र व्यक्ती खोटं सांगून ब्राम्हण घरात कामाला असल्याने... त्यांचा देव बाटला...!

शिंदे म्हणतात, उच्चवर्णिय व्यक्ती सुशिक्षित ब्राम्हण महिला अधिकारी यांनी या महिलेवर 'देव बाटला म्हणून...' सिंहगड रोड पोलिस स्टेशन अंकित (अभिरूची पोलिस चौकी) मध्ये... आज गुन्हा दाखल केला. हि घटना अत्यंत भयानक असून... भारतीय राज्यघटनेला छेद देणारी आहे. या प्रकरणात... पोलिसांनी गुन्हा नोंदवला कसा...? हिच मोठी शोकांतीका आहे. तिथे 'संभाजी ब्रिगेड' लढली. परंतु उध्दट उच्चवर्णिय व्यक्ती सुशिक्षित ब्राम्हण महिला 'हवामान खात्यात' अधिकारी असल्याने व सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या महिला अधिकाऱयावर प्रचंड दबाव टाकून मराठा महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी भारतीय राज्यघटनेचा अवमान केला असून... देव बाटला म्हणून 'हवामान खात्यात' शासकीय अधिकारी असलेल्या ब्राम्हण महिलेने... दाबाव टाकून... गुन्हा दाखल करत... लोकशाही चा खुन केला...! परंतु... आम्ही शांत बसणार नाही... कारण ही घटना सहन ही होणारी नाही...!, असे जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com