तुकोबा हे सारस्वतांचे शब्दसूर्य - डॉ. देखणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

पुणे - ‘‘चंदनाला कशाचा लेप लावावा, अमृताला कशात रांधावे, आकाशाला कशाचे मंडप लावावे... हे जितके अवघड आहे, तितकेच तुकोबांना शब्दांत बसवणे अवघड आहे. तुकोबा हे स्वत:च सारस्वतांचे शब्दसूर्य होते,’’ असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. जे सामर्थ्य सूर्याच्या प्रकाशाचे तेच सामर्थ्य तुकोबांच्या अभंगवाणीचे आहे. म्हणून त्यांच्यावरील ग्रंथ हे सूर्याच्या किरणांसमान आहेत,’’ असेही ते म्हणाले.

‘सकाळ प्रकाशना’च्या वाचक महोत्सवांतर्गत आयोजित समारंभात सरश्री लिखित ‘संतांमध्ये संत तुकाराम महाराज ः अभंग रहस्य आणि जीवनचरित्र’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. देखणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी ‘तुका झालासे कळस’ या विषयावर मुक्तसंवाद साधला. संशोधक वा. ल. मंजुळ, ‘तेजज्ञान फाउंडेशन’च्या कार्यकारी विश्‍वस्त तेजविद्या, ‘सकाळ प्रकाशना’च्या संपादक दीपाली चौधरी उपस्थित होत्या.

देखणे म्हणाले, ‘‘तुकोबा हा विषय अतिशय व्यापक आहे. कित्येक लेखक, अभ्यासक-संशोधक, तत्त्ववेत्ते तुकोबारायांचा आयुष्यभर अभ्यास करतात. त्यांच्या कुतूहलाचा, अभ्यासाचा हा विषय आहे. तुकोबांची अभंगवाणी हे मराठी माणसाचे, सारस्वतांचे एक प्रकारचे अनमोल धन आहे. तुकोबारायांचा प्रत्येक शब्द अभंग झाला. त्यांनी सर्वसामान्य माणसांना शहाणे केले. त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास झाला पाहिजे.’’

मंजुळ म्हणाले, ‘‘तुकाराम महाराज यांच्यावर श्रीधर मोरे आणि वा. सी. बेंद्रे यांनी लिहिलेले चरित्र उत्तम आहेत; पण बहुतांश चरित्र हे चमत्कार, भाव-भक्तीवर आधारित आहेत. तुकारामांचे तत्त्वज्ञान सांगणारे चरित्र फार कमी आहेत. खरंतर वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळ्या अभ्यासकांनी त्यांच्यावर लिहिले आहे. त्यामुळे तुकाराम महाराज यांच्याबद्दल आंतरराष्ट्रीय अभ्यासकांमध्येसुद्धा किती उत्सुकता आहे, हे समजते. तुकारामांच्या अभंगाच्या हस्तलिखितांचा अभ्यास व्हायला पाहिजे. वेगवेगळे अभंग गाथेत आहेत का, हे पाहायला हवे.’’

Web Title: pune news dr. ramchandra dekhane talking