नालेसफाईचा प्रशासनाचा अहवाल फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

महापौर टिळक यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून पुन्हा नाराजी

महापौर टिळक यांच्यासह पदाधिकाऱ्यांकडून पुन्हा नाराजी
पुणे - शहरातील नालेसफाईच्या कामाबाबत महापालिका प्रशासनाकडून सादर करण्यात आलेला अहवाल वस्तुस्थितीदर्शक नसल्याची टीका करीत केलेल्या कामांचा कृती अहवाल सादर करण्याची सूचना महापौर मुक्ता टिळक यांनी प्रशासनाला शुक्रवारी केली. "नालेसफाईची कामे झाली आहेत तर, मग रस्त्यांवर पाणी साचते कसे', असा प्रश्‍न स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी उपस्थित केला.

शहरात पावसाला नुकतीच सुरवात झाली आहे. मात्र, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून नाल्यांना पूर आला आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात कचरा वाहत असल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही सदस्यांनी प्रशासनावर मोठ्या प्रमाणात प्रश्‍न उपस्थित केले होते. नालेसफाईचा मुद्दा ऐरणीवर आल्यामुळे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी 15 अधिकाऱ्यांची नेमणूक केली
होती. तसेच या कामांचा अहवाल सादर करण्याचा आदेश प्रशासनाला दिला होता. हा अहवाल अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी महापौरांनी बोलाविलेल्या बैठकीत शुक्रवारी सायंकाळी सादर केला.

"नालेसफाईची कामे योग्य पद्धतीने झाली आहेत,' असे त्यात म्हटले होते. अहवालाचा आढावा घेतल्यावर, महापौर टिळक, मोहोळ आणि भिमाले यांनी, "कामे झाली असतील तर पाणी साचतेच कसे', "नाल्यांना पूर येतो कसा' आदी प्रश्‍न उपस्थित केले. त्याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाला देता आले नाही. त्यामुळे महापौर टिळक यांनी नाराजी व्यक्त करत हा अहवाल फेटाळून लावला. महापालिका या स्थितीबाबत नेमकी कोणती कामे करणार आणि याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार, याचा कृती अहवाल तातडीने सादर करण्याची सूचना महापौरांनी प्रशासनास केली.

नालेसफाईवर खर्च किती?
शहरातील नाल्यांची एकूण संख्या, पावसाळ्यापूर्वी किती नाल्यांमध्ये कामे झाली, त्यावर किती खर्च झाला, त्यांची सद्यःस्थिती काय, आणखी कोणत्या उपाययोजना केल्या, या बाबतची माहिती अहवालात नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पाणी साठणाऱ्या ठिकाणी काय उपाययोजना केल्या, याचाही तपशील अहवालात नव्हता. तसेच याबाबत विचारलेल्या कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देता आले नसल्याचे त्यांनी सांगितले.

पुढील उपाययोजना कोणत्या?
नालेसफाई झाली नसल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार, असे आयुक्तांनी यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, अहवालात संबंधित सर्वच अधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने कामे केली, काही ठिकाणी भौगोलिक परिस्थितीमुळे अडचणी आल्या, असे म्हटले आहे. त्यामुळे कोणावर कारवाई करण्याचा प्रश्‍नच उद्‌भवला नाही. हडपसर क्षेत्रीय कार्यालयात 63 टक्के तर बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 49 टक्के कमी दराने नालेसफाईच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. त्यामुळे तेथील कामांबाबत चौकशी करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली होती. त्याबाबतही अहवालात काही वक्तव्य करण्यात आले नाही. पुढील काळात कोणत्या उपाययोजना करण्यात येतील, या बाबतही अधिकारी खुलासा करू शकले नाहीत.