उपमहापौरपदी डॉ. सिद्धार्थ धेंडे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

काँग्रेसच्या लता राजगुरू यांच्या माघारीमुळे बिनविरोध निवड

काँग्रेसच्या लता राजगुरू यांच्या माघारीमुळे बिनविरोध निवड

पुणे - शहराच्या उपमहापौरपदी भारतीय जनता पक्ष-रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) युतीचे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार लता राजगुरू यांनी माघार घेतली. शिवसेनेनेही डॉ. धेंडे यांना पाठिंबा दिला. उपमहापौरपदावर
असताना नवनाथ कांबळे यांचे १६ मे रोजी अकस्मात निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी बुधवारी निवडणूक होती. महापालिकेच्या खास सर्वसाधारण सभेत महापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली आणि पीठासीन अधिकारी लहुराज माळी यांच्या उपस्थितीत निवडणुकीची प्रक्रिया झाली. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी माळी यांनी १५ मिनिटांची वेळ दिली. त्या वेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत राजगुरू यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर डॉ. धेंडे यांची उपमहापौरपदावर बिनविरोध निवड झाल्याची घोषणा माळी यांनी केली.

रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी काँग्रेसच्या अखिल भारतीय महासमितीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी पक्षाकडे केली होती. नवनाथ कांबळे यांना श्रद्धांजली अर्पण करून डॉ. धेंडे यांनी उपमहापौरपदाची सूत्रे स्वीकारली. डॉ. धेंडे हे प्रभाग क्रमांक चारमधून विजयी झाले आहेत. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून पदवी आणि त्यानंतर पदव्युत्तर पदवी डॉ. धेंडे यांनी घेतली आहे. फुलेनगर परिसरात दहा रुपयांत रुग्णांची तपासणी करणारे डॉक्‍टर, अशी धेंडे यांची ओळख होती. त्याच परिसरात सध्या त्यांचे १५ खाटांचे रुग्णालय आहे. महापालिकेत २००७ मध्ये ते पहिल्यांदा निवडून आले. महापालिकेच्या मागच्या कार्यकाळात रिपब्लिकन पक्षाचे गटनेते म्हणून ते कार्यरत होते.