‘ई-वाचना’ची संस्कृती रुजतेय

रीना महामुनी-पतंगे
मंगळवार, 11 जुलै 2017

पुणे - पुस्तक खरेदी करून ती वाचण्याच्या संस्कृतीबरोबरच आता इंटरनेटच्या साहाय्याने ‘ई-वाचना’ची संस्कृती रुजत आहे. ‘बुक फ्रेंडली’ होण्याचा संदेश आजची तरुणाई या पद्धतीने फॉलो करताना दिसतेय. आय पॅड, स्मार्ट फोन, टॅब्लेट, नोट पॅड हाती बाळगणारी हे यंगस्टर्स आता एका क्‍लिकवर हजारो पानांचे ‘ई-बुक’ डाऊनलोड करून वाचताहेत. गेल्या काही वर्षांपासून ‘ई वाचना’चा ट्रेंड मोठ्या प्रमाणात रुजतोयं. 

पुणे - पुस्तक खरेदी करून ती वाचण्याच्या संस्कृतीबरोबरच आता इंटरनेटच्या साहाय्याने ‘ई-वाचना’ची संस्कृती रुजत आहे. ‘बुक फ्रेंडली’ होण्याचा संदेश आजची तरुणाई या पद्धतीने फॉलो करताना दिसतेय. आय पॅड, स्मार्ट फोन, टॅब्लेट, नोट पॅड हाती बाळगणारी हे यंगस्टर्स आता एका क्‍लिकवर हजारो पानांचे ‘ई-बुक’ डाऊनलोड करून वाचताहेत. गेल्या काही वर्षांपासून ‘ई वाचना’चा ट्रेंड मोठ्या प्रमाणात रुजतोयं. 

ई-वाचन प्रकारामध्ये फेसबुक, ट्‌विटर, ब्लॉग आदी विविध साइट यासोबतच ई-पुस्तके वाचण्याकडे कल वाढलायं. ‘ब्लॉग’मध्ये विविध क्षेत्रातील लोकप्रिय, तज्ज्ञ लोकांचे ब्लॉग फॉलो केले जाताहेत. प्रसिद्ध लेखकांनी लिहिलेल्या ब्लॉगला मिळणारी लाइक्‍सची संख्या पाहून त्यांची पुस्तकेही ई-बुक स्वरूपात येताहेत. दुकानात जाऊन पुस्तक निवडणे आणि ते विकत घेण्यात भरपूर वेळ खर्च होतो आणि हवं ते पुस्तक मिळेल याची खात्री देता येत नाही. पुस्तकाची हार्ड कॉपी सांभाळावी लागते. ते सर्व ठिकाणी स्वतःजवळ बाळगणे शक्‍य नसते. या उलट स्मार्ट गॅजेट्‌सवर ई-बुक्‍सचे ऑनलाइन किंवा डाऊनलोड करून वाचणे सहज सोपे जाते.  इंटरनेटवर विविध ई-बुक्‍स, ॲप उपलब्ध आहेत. ते डाऊनलोड करून माफक दरात ऑनलाइन पुस्तके घेता येतात, तर काही साइटवर मोफत पुस्तके उपलब्ध आहेत. ते वाचण्याकडे लोकांचा कल अधिक आहे. ‘ई-बुक रीडर’ हे खास पुस्तकांसाठीचे गॅझेट आहे. ज्यामध्ये शेकडो पुस्तके संग्राह्य स्वरूपात ठेवता येऊ शकतात. ‘किंडल’ हेदेखील ‘ई-बुक रीडर’ गॅझेट अधिक पॉप्युलर आहे. 

‘ई-वाचन’ संस्कृतीबद्दल अनिता बडगर सांगते, ‘‘काही पुस्तके प्रिंट स्वरूपात बाजारात उपलब्ध नसतात. ही पुस्तके इंटरनेटवर सर्च करून ऑनलाइन वाचली जातात किंवा डाऊनलोड करण्यात येतात. यासाठी ई बुक्‍स ॲपचा वापर होतो. ‘द लिटल प्रिन्स’ या फ्रेंच पुस्तकाची इंग्रजी स्वरूपातील प्रत उपलब्ध नव्हती, या पुस्तकांची ई-आवृत्ती मला ई-बुक्‍स ॲपच्या साह्याने मिळाली. ई-बुक्‍स तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध असल्याने ती विकत घेणे सहज शक्‍य होते.’’ 

स्पर्धा परीक्षेसाठीही उपयोग
स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी अमरजा शिंदे म्हणाली, ‘‘तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींनी फेसबुक, ब्लॉगच्या साहाय्याने अभ्यासपूर्ण माहिती शेअर केली आहे. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी ठराविक पुस्तकांखेरीज अन्य संदर्भासाठी ‘ई-वाचन’ ही संकल्पना सोईस्कर वाटते.’’

खरंतर इंग्रजी पुस्तकांबरोबरच असंख्य मराठी पुस्तकाच्या इंटरनेट आवृत्ती उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काही पुस्तके इंटरनेटवर वाचणे आणि अपलोड करण्याची सोयही आहे. मात्र, यासंदर्भात फारशी माहिती नसल्यामुळे मराठीतील ‘ई-बुक्‍स’ कमी प्रमाणात वाचली जात असल्याचे दिसून येते.