अधिसभेसाठी 51 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

अधिसभेसाठी 51 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसाठी आज (ता. 19) झालेल्या मतदानानंतर 51 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीत विजय मिळवून अधिसभेत कोण जाणार, याचा निर्णय 27 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. व्यवस्थापन प्रतिनिधीसाठी 98 टक्के, तर पदवीधरांसाठी सुमारे 40 टक्के मतदान झाले. नाशिक येथे एक बोगस मतदान झाल्याची तक्रार वगळता सर्वच ठिकाणी शांततेत मतदान झाले.

व्यवस्थापन प्रतिनिधीच्या चार जागा आणि नोंदणीकृत पदवीधर दहा, अशा चौदा जागांसाठी आज मतदान झाले. व्यवस्थापन प्रतिनिधीसाठी 228 मतदार होते. त्यापैकी 225 जणांनी मतदान केले. या मतदारसंघात सात उमेवार होते. पदवीधरांसाठी एकूण 48 हजार मतदारांपैकी बहुतांश जणांनी या प्रक्रियेकडे पाठ फिरविली. केवळ 20 ते 22 हजार जणांनी मतदानाचा हक्क बजावला. या मतदारसंघात 37 उमेदवारांनी निवडणूक लढविली. एकता आणि प्रगती अशा प्रमुख दोन पॅनेलमध्ये ही लढत झाली. यात कोण बाजी मारणार यासाठी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारसंघातील मतदारांची संख्या कमी असल्याने सकाळपासूनच उमेदवार अधिकाधिक मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न करीत होते. पुण्यात 141 मतदार होते. पुण्यामध्ये विद्यापीठातील क्‍लासरूम कॉम्प्लेक्‍समध्ये मतदान झाले. दुपारी तीनपर्यंत 133 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी मतदान संपेपर्यंत 139 जणांनी मतदान केले. नगरच्या मतदार यादीतील एका मतदाराने वैद्यकीय कारणास्तव पुण्यात हक्क बजावला. नाशिकमध्ये 41 मतदारांपैकी 40 जणांनी, तर नगरमधील 46 पैकी 46 जणांनी मतदान केले. पुण्यातील मतदारांची संख्या विचारात घेता या मतांची विभागणी कशी होते, यावर विजयी उमेदवार निश्‍चित होणार आहे.

पदवीधरसाठी निश्‍चित केलेल्या 113 मतदान केंद्रांवर दिवसभरात धीम्या गतीने मतदान झाले आहे. मतदारांची संख्या अधिक असल्याने जिल्हानिहाय आकडेवारी घेण्याचे काम विद्यापीठातील निवडणूक शाखेत रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तीन जिल्ह्यांत सरासरी 40 टक्के म्हणजे 22 हजारांपर्यंत मतदान झाल्याचा अंदाज विद्यापीठाने वर्तविला आहे.

निवडणुकीतील उमेदवार
व्यवस्थापन प्रतिनिधी

श्‍यामकांत देशमुख
सोमनाथ पाटील
दीपक शहा
राजेंद्र विखे पाटील
संदीप कदम
अशोक सावंत
राजीव जगताप

नोंदणीकृत पदवीधर
प्रसेनजित फडणवीस, अभिषेक बोके, संतोष ढोरे, युवराज नरवडे, दादाभाऊ शिनलकर, क्षितिज घुले, बाकेराव बस्ते, बापूसाहेब गायके, प्रमोद जगताप, भरत कर्डक, शिरीष खताळ, नयन कुशार, योगेश लांडे, सुदाम मांडगे, राजू पाणमंद, प्रकाश पाटील, रोहन शेट्टी, संदीप शिंदे, महावीर वजाळे, अनिल विखे, तानाजी वाघ, सुभाष चिंधे, भाग्यश्री कानडे, संजय पवार, योगेश पवार, मनोज तेलोरे, शशिकांत तिकोटे, प्रल्हाद बर्डे, विश्‍वनाथ पाडवी, संजय चकोर, हेमंत दिघोळे, संदीप गाढे, अमोल खाडे, विजय सोनवणे, तबस्सुम इनामदार, मनीषा कमानकर, भाग्यश्री मंठाळकर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com