महावितरण सुस्त; ग्राहक त्रस्त!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

पुणे - रविवार पेठेसह नऱ्हे-आंबेगाव, कात्रज, वडगाव, धायरी व कोथरूडसह शहर व उपनगरांतील विविध ठिकाणी विजेचा लपंडाव अजूनही सुरूच आहे. बिल भरले नाही, तर मीटर काढण्याची कारवाई महावितरण कंपनीकडून करण्यात येते. मात्र कंपनीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने कोथरूड, नऱ्हे-आंबेगाव परिसरातील बहुतांश नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. 

देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली दर गुरुवारी शहर व उपनगरांतील वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात येतो. हे मान्य केले तरीही आठवड्यातील इतर दिवशीदेखील वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. त्यावर मात्र महावितरणचे नियंत्रण नाही. रविवार पेठेतही शुक्रवारी सकाळी एक ते दीड तास वीजपुरवठा खंडित झाला होता. गुरुवारी रात्री साडेअकरा-बाराच्या दरम्यान गेलेली वीज शुक्रवारी सकाळी साडेदहा-अकरा वाजता आली. त्यामुळे तेथील नागरिकांचेही हाल झाले. कोथरूड पोलिस ठाणे व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाल्याने या भागातील रहिवाशांचेही हाल झाले. सोसायट्यांमध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नाही. 

पावसामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे मोघम उत्तर महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. कोथरूड पोलिस चौकीजवळील परिसरात गुरुवारी रात्री आग लागल्यामुळे तेथील सहा रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर) बंद होती. शुक्रवारी दुपारी एकनंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याचे या विभागाचे कार्यकारी अभियंता अमित बारटक्के यांनी सांगितले. 

कोथरूड परिसरात चाळीस ट्रान्स्फॉर्मर आहेत. परंतु, पोलिस स्टेशनजवळील एका रोहित्राच्या ठिकाणी अचानक आग लागली. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. नागरिकांना सेवा पूर्ववत मिळावी यासाठी पहाटेपासून कर्मचारी काम करत होते.
- अमित बारटक्के, कार्यकारी अभियंता, कोथरुड  विभाग

Web Title: pune news electricity issue