अर्ज भरूनही नाव नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

विद्यार्थ्यांना मनस्ताप; हरकतींसाठी आजपर्यंत मुदत

विद्यार्थ्यांना मनस्ताप; हरकतींसाठी आजपर्यंत मुदत
पुणे - अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज भरूनही सर्वसाधारण गुणवत्ता यादीत अनेक विद्यार्थ्यांची नावे आलेली नाही. यामुळे मनस्ताप सहन करावा लागल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. मात्र, या माहितीची शहानिशा करून या विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट केली जातील, असे उपसंचालक कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्जाचा भाग एक आणि दोन भरल्यानंतर या प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांची सर्वसाधारण यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्यात नाव शोधण्याचा प्रयत्न केला; पण त्यात नाव आले नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या संदर्भात विहित अर्ज भरून मार्गदर्शन केंद्रावर तक्रार केल्याचे एका पालकाने सांगितले.

सहायक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिली असता त्या म्हणाल्या, 'सर्वसाधारण गुणवत्ता यादी विद्यार्थ्याचे नाव आले नाही तर त्यासंबंधी हरकत नोंदविण्यास गुरुवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे यादीत नाव आले नसेल, तर त्याची शहानिशा करून ते समाविष्ट करण्यात येईल. या शिवाय विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, जातीसंवर्ग आदी माहितीमध्ये बदल असल्यासही तसे नमूद करता येईल.''

पहिली यादी दहा जुलैस
अकरावी प्रवेश प्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी बुधवारी प्रसिद्ध झाली. ही प्रवेशाची नियमित यादी असल्याचा विद्यार्थ्यांचा गैरसमज झाला होता. याबाबत राऊत म्हणाल्या, ""सर्वसाधारण यादी ही केवळ माहितीमधील दुरुस्तीसाठी प्रसिद्ध केलेली आहे. पहिल्या प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी दहा जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालये वाटप केली जाणार आहेत.''

टॅग्स