'रोजगाराबरोबरच परमार्थ साधता आला '

'रोजगाराबरोबरच परमार्थ साधता आला '

पुणे - ""प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाची घोषणा केल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना गतिमान झाल्या. सरकारने राबविलेल्या ई-गव्हर्नन्स धोरणामुळेच मला कोंढवा खुर्द येथे कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) उघडण्याची संधी मिळाली. या माध्यमातून मला रोजगार तर मिळालाच, परंतु सामान्य लोकांना योजनांचा लाभ देण्याने परमार्थही साधता आला,'' अशी भावना श्रीमती रईसा राज फय्याज यांनी व्यक्त केली. त्यांची ही यशोगाथा इतर महिलांसाठीही निश्‍चितच प्रेरणादायी आहे. 

कोंढवा खुर्द येथे राहणाऱ्या रईसा यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वयंरोजगाराची वाट निर्माण केली आहे. या यशस्वी प्रवासाबद्दल त्या म्हणतात, ""माझे पती रिक्षाचालक होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने त्यांचे निधन झाले. घरची परिस्थिती बेताची होती, त्यातच दहावीपर्यंत शिक्षण आणि पदरात दोन मुले अशी माझी स्थिती होती. सुरवातीला उदरनिर्वाहासाठी लहान मुलांचे शिकवणी वर्ग घ्यायला सुरवात केली. घरच्या परिस्थितीमुळे आणि लग्नानंतरच्या कौटुंबिक जबाबदारीमुळे हुशार असूनही माझे शिक्षण थांबले होते. शिकवणी वर्ग घेत असतानाच मी बारावी, पदवी आणि नंतर कॉम्प्युटर डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. माझ्याबरोबरच आजूबाजूच्या महिला व मुलींना संगणक साक्षरतेचे धडे द्यायला सुरवात केली.'' 

ई-गव्हर्नन्स धोरणामुळे मला 6 सप्टेंबर 2016 रोजी कोंढवा खुर्द येथे कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) उघडण्याची संधी मिळाली. या माध्यमातून सरकारी दाखले, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, नॉन-क्रिमिलेयर दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र आदींसह केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ लोकांना उपलब्ध करून दिला. याच कालावधीत पुण्यात झालेल्या डीजी धन मेळाव्यात माझ्या कामाचे कौतुक झाले. सन 2015-16 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने मला 13 आधार कार्ड मशिन मिळाल्या. जिल्ह्यातील वेल्हा, जुन्नर, मंचर, हवेली तालुक्‍यांत शिबिरे घेऊन अनेक लोकांना आधार कार्डांचे वितरण केले, असेही त्यांनी सांगितले. 

केंद्र सरकारचा "दिशा' संगणक साक्षरतेचा कोर्स आला आहे. याचा लाभ अनेकांना मिळावा यासाठी प्रयत्नशील आहे. तसेच, सरकारचे कॅशलेस इकॉनॉमीचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. इतर महिलांनीही विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे. 
- रईसा राज फय्याज, कॉमन सर्व्हिस सेंटर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com