औषध निर्माण क्षेत्रात उत्तम रोजगार

औषध निर्माण क्षेत्रात उत्तम रोजगार

विज्ञान शाखेतील उत्तम रोजगाराची संधी मिळवून देणारे क्षेत्र म्हणून ‘फार्मसी’कडे पाहिलं जातं. जगात औषधनिर्मिती क्षेत्रात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. सर्वांत स्वस्त औषध पुरवठादार म्हणून भारताची ओळख आहे. अनेक दुर्धर आजारांवरील औषधांवरदेखील भारतात यशस्वी संशोधन होत आहे. आरोग्यविषयक अनेक सॉफ्टवेअर विकसित होत आहेत. क्‍लिनिकल रिसर्च, क्‍लिनिकल ट्रायल्स, फार्माकोव्हिजिलन्स, बायोइन्फॉरमॅटिक्‍स, फार्माकोइन फॉरमॅटिक्‍स इत्यादी क्षेत्रे खुली होत आहेत. केमिकल कंपन्यांमध्येसुद्धा ‘फार्मसी’चे शिक्षण घेतलेले उमेदवार मोठ्या प्रमाणात आवश्‍यक असतात.

शैक्षणिक पात्रता : फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावीत (विज्ञान) आवश्‍यक त्या गुणांनुसार पास असणं आवश्‍यक आहे. 

अभ्यासक्रम:
१. डी. फार्मसी (औषध निर्माणशास्त्र पदविका) 
बारावीनंतर दोन वर्षांचा हा कोर्स असतो. बारावीच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित/ जीवशास्त्र यांतील गुणांनुसार या अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. पदविका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर पदवीच्या थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, शासकीय विभागात आणि फार्मसीचे दुकान या संधी उपलब्ध असतात.

२.  बी. फार्मसी (औषध निर्माणशास्त्र पदवी)  
बारावीनंतर चार वर्षांचा हा कोर्स असतो. बारावीनंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित/ बायोटेक्‍नॉलॉजी/ जीवशास्त्र हे विषय घेऊन बारावीत (विज्ञान) आवश्‍यक त्या गुणांनुसार उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाची एमएचटी-सीईटी ही परीक्षा दिलेली असावी. औषध निर्माण कंपन्यांमध्ये तसेच शासकीय विभागात नोकरीच्या संधी असतात. 

३. एम. फार्मसी (औषध निर्माणशास्त्र पदव्युत्तर पदवी)
बी. फार्मसीनंतर दोन वर्षांचा हा कोर्स असतो. एम फार्मसी हा अभ्यासक्रम फार्मस्युटिक्‍स, फार्मस्युटिकल केमिस्ट्री, फार्मकॉलॉजी, फार्मकॉग्नोसी, क्वालिटी ॲश्‍युरेन्स, क्वालिटी ॲश्‍युरेन्स टेक्‍निक्‍स, इंडस्ट्रियल फार्मसी इत्यादी विषयांमध्ये पूर्ण करता येतो. हा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर फार्मसी क्षेत्रातील विविध कंपन्यांमधील संशोधन विभागांमध्ये नोकरी करता येते. तसेच डी. फार्मसी व बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना शिकवता येते.

४. फार्म डी. (डॉक्‍टर ऑफ फार्मसी)
बारावीनंतर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व गणित/ बायोटेक्‍नॉलॉजी/ जीवशास्त्र हे विषय घेऊन बारावीत (विज्ञान) आवश्‍यक त्या गुणांनुसार (खुला वर्ग- ५० टक्के आणि मागास वर्ग- ४५ टक्के) पास असणं आवश्‍यक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या सीईटी परीक्षेत कमीत कमी ५० टक्के गुण मिळालेले असावेत. बारावीनंतर हा सहा वर्षांचा कोर्स असून, डॉक्‍टरसोबत या विद्यार्थ्यांना काम करावे लागत असल्याने हे विद्यार्थी डॉक्‍टरला औषध लिहून देण्यात मदत करू शकतात. 

नोकरीच्या संधी :
फार्मसी पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी व डॉक्‍टर ऑफ फार्मसी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना शासकीय क्षेत्रात, केमिकल इंडस्ट्रीज, अन्न व औषध प्रशासन इत्यादी क्षेत्रांत संधी मिळतात. तसेच स्वतःचे मेडिकल स्टोअर सुरू करता येते. बायोटेक्‍नॉलॉजी कंपन्यांमध्येही फार्मासिस्ट ना चांगल्या संधी उपलब्ध आहेत. काही जण फार्मास्युटिकल प्रॉडक्‍ट्‌सच्या सेल्स व मार्केटिंगचेही काम करतात.

पदांची माहिती :
१. फार्मासिस्ट 
फार्मसी पदवीधारकांना हेल्थ सिस्टिम फार्मासिस्ट, हॉस्पिटल फार्मासिस्ट, कम्युनिटी फार्मासिस्ट, इंडस्ट्रियल फार्मासिस्ट, रिटेल फार्मासिस्ट आणि रिसर्च फार्मासिस्ट म्हणून काम करता येते.

२. क्वालिटी ॲश्‍युरन्स
क्‍लिनिकल केअर योजना विकसित करणे, प्रतिकूल औषधोपचाराच्या घटनांचा तपास करणे, तसेच असाध्य आजारांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम क्वालिटी ॲश्‍युरन्समध्ये काम करणारे फार्मसी पदवीधर विद्यार्थी करतात.

३. क्वालिटी कंट्रोल
औषधे नियामक मंडळाच्या नियमानुसार गुणवत्ता पूर्ण औषधांची निर्मिती होत आहे की नाही, हे पाहण्याचे काम क्वालिटी कंट्रोलमध्ये काम करणारे फार्मसी पदवीधर विद्यार्थी करतात.

४. क्‍लिनिकल रिसर्च
बायोईक्विलन्स, बायोआवालाबिलिटी, सेंट्रल लॅबॉरेट्रीज यासारख्या ठिकाणी क्‍लिनिकल ट्रायल्स, क्‍लिनिकल रिसर्च, इन्व्हेस्टिगेशन, टेक्‍निकल रायटर्स इत्यादी पदांवर काम करण्यासाठी फार्मसी पदवीधर लागतात.

मत्स्यविज्ञान अभ्यासक्रम (बीएफएससी)
महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठात मत्स्यविज्ञान अभ्यासक्रम. कालावधी चार वर्षे. तेलंगखेडी (नागपूर), मुंबई, शिरवळ (सातारा), उदगीर (लातूर) व पुसद (यवतमाळ) येथील महाविद्यालयांत अभ्यासक्रम. बारावीमध्ये भौतिक, जीव व रसायनशास्त्रात ५० टक्के (खुला गट) आणि ४० टक्के (मागासवर्गीय) गुण आवश्‍यक.

दुग्धतंत्रज्ञान अभ्यासक्रम (बीटेक डेअरी)
कालावधी चार वर्षे. दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती क्षेत्रात संधी. बारावीमध्ये खुला प्रवर्ग ५० टक्के आणि राखीव प्रवर्ग ४० टक्के गुण आवश्‍यक. वरुड (पुसद) आणि लातूर येथील दोन शासकीय महाविद्यालयांत अभ्यासक्रम.

अभियांत्रिकी, आयटी, एमबीएनंतर...
अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञान असो, की एमबीए... हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीबरोबरच स्वयंरोजगाराच्या संधी खूप आहेत. याविषयी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर अरिहंत महाविद्यालयाचे प्राध्यापक विकास घोगरे यांनी दिलेली उत्तरे.

अभियांत्रिकी शाखेत आहे. त्यानंतर एमबीए करताना काय करू? कोणत्या संधी आहेत?
अभियांत्रिकी पदवी तंत्रज्ञानासंबंधित आहे. त्यानंतर एमबीए करण्यासाठी प्रॉडक्‍शन, ऑपरेशन मॅनेजमेंट, टेक्‍नॉलॉजी, प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट हे काही पर्याय आहेत.
कॉमर्सनंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल, तर कसे करता येईल?
बीकॉम करताना गणित आणि संख्याशास्त्र विषय असल्यास एमसीए करून माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात जाता येते. 
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात उदयोन्मुख उपक्षेत्रे कोणती आहेत. त्यात करिअर कसे करता येईल?
- मोबिलिटी, ॲनॅलिटिक्‍स, क्‍लाऊड कॉम्प्युटिंग आणि सोशल मीडिया अशी या क्षेत्रात ‘मॅक्‍स’ संकल्पना आहे. त्यातही करिअरच्या चांगल्या संधी आहेत.
बीसीए आणि बीएस्सी संगणकशास्त्र यापैकी कोणता अभ्यासक्रम निवडावा?
गणित विषय अवघड वाटत असेल, तर बीसीएची निवड योग्य ठरेल; पण गणित विषय चांगला असेल, तर बीएस्सीचा पर्याय निवडावा.

एमबीए करताना तंत्रज्ञानविषयक कोणती कौशल्ये आत्मसात करावीत?
संगणकाचे प्राथमिक ज्ञान, डेटा बेस मॅनेजमेंट तसेच आपल्या एमबीएमधील विषयानुसार एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग (ईआरपी) या संगणक प्रणालीतील मोड्यूलचा अभ्यास करावा.

माहिती-तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतल्यानंतर स्वयंरोजगार कसा करता येईल?
- संकेतस्थळ डिझाइन करणे आणि विकसित करणे, ई कॉमर्स, सोशल मीडिया मार्केटिंग, स्थानिक उद्योजकांच्या मागणीनुसार सॉफ्टवेअर वा ॲप्लिकेशन तयार करणे, असे अनेक व्यवसाय करता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com