लांडग्यांच्या संवर्धनासाठी मिहिरचा पुढाकार 

नीला शर्मा
मंगळवार, 6 जून 2017

पुणे - फोटोग्राफीसाठी भटकंती करणाऱ्या तरुणांनी सासवड परिसरातील लांडग्यांच्या जतन व संवर्धनाचा ध्यास घेतला आहे.  मिहिर गोडबोलेच्या पुढाकारानं या निसर्गप्रेमींनी गेल्या आठ- नऊ वर्षांच्या सखोल अभ्यासातून या संदर्भात एक महत्त्वपूर्ण योजना तयार केली आहे. शासन व लोकसहभागातून ती साकार झाल्यास निसर्ग संतुलन व रोजगाराच्या दृष्टिकोनातून नवा पायंडा पडू शकतो.

पुणे - फोटोग्राफीसाठी भटकंती करणाऱ्या तरुणांनी सासवड परिसरातील लांडग्यांच्या जतन व संवर्धनाचा ध्यास घेतला आहे.  मिहिर गोडबोलेच्या पुढाकारानं या निसर्गप्रेमींनी गेल्या आठ- नऊ वर्षांच्या सखोल अभ्यासातून या संदर्भात एक महत्त्वपूर्ण योजना तयार केली आहे. शासन व लोकसहभागातून ती साकार झाल्यास निसर्ग संतुलन व रोजगाराच्या दृष्टिकोनातून नवा पायंडा पडू शकतो.

 मिहिर म्हणाला, मनुष्यवस्तीत लांडग्यांसारख्या वन्य प्राण्यांकडून हल्ले होतात. परिणामी त्यांचा नायनाट करण्याकडे स्थानिकांचा कल होतो. परिसंस्थेतील प्रत्येक घटक आपापली भूमिका बजावत असतो. त्यापैकी एखादाही नष्ट झाला की, एकंदरित परिसंस्थेला झळ पोहोचते. हेच आम्हाला सासवड परिसरात दिसलं. माळढोक पक्ष्याची छायाचित्रं घेण्यासाठी मी पूर्वी खूप फिरायचो. जाईन तिथल्या स्थानिकांशी बोलणंही व्हायचं. दिवेघाटच्या जवळपास लांडगे दिसतात असं कळल्यावर तिथे गेलो. एक- दीड वर्ष लांडगा अजिबात दिसला नाही. तिथल्या रहिवाशांना सागून ठेवलं होतं की, दिसल्यावर लगेच कळवा. नंतर मात्र लांडग्यांचे चार- पाच कळप आढळले. सुरवातीला मी, मग दोघे, नंतर चौघे जण जोडले गेले. आता आम्ही आठ जण या अभ्यासप्रकल्पात आहोत.’’ 

सासवडमध्ये वावरणाऱ्या लांडग्यांचा खुराक परिसरातील पोल्ट्रीतून बाहेर टाकलेले मृत पक्षी आहेत, असं या मंडळीच्या लक्षात आलं. मिहिरनं सांगितलं की, या भागात ठराविक कालावधीत असणाऱ्या धनगरांच्या शेळ्यांना लांडगे भक्ष्य करतात, असा पूर्वी लोकांचा समज होता. मात्र पोल्ट्रीबाबतच्या नव्या माहितीमुळे आम्ही तो अभ्यास केला. लांडग्यांच्या विष्ठेची पॅथॉलॉजिकल तपासणी केल्यावर त्यात कोंबड्यांचे अवशेष अधिक प्रमाणात आढळून आले. लांडग्याच्या प्रजननाचा काळ हिवाळ्यात असतो. त्या सुमारास लांडगे या परिसरात लपणं, खाद्य व पाण्याच्या अनुकूल जागा असल्यानं मुक्काम ठोकून असतात. 

नवी पिल्लं मोठी होऊ लागली की, ते पुन्हा येथून पांगतात. तरस, खोकड, रानमांजर, उदमांजर, साळिंदर, कोल्हा, चिंकारा, चौसिंघा व मुगुंस या भागात दिसतात. विविध प्रकारचे पक्षी आणि अनेक प्रकारच्या वनस्पतींनी संपन्न असा हा प्रदेश आहे.

मिहिर म्हणतो, ‘‘दिवेघाट ते भुलेश्वर हा लांडग्यांना प्रजननासाठी सोयीचा वाटणारा भाग शासनयंत्रणा व लोकसहभागातून संरक्षित क्षेत्र ठरावा. पर्यटन स्थळाचा दर्जा याला मिळावा, तसेच स्थानिक गरजूंना त्यातून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. माझ्याबरोबर मिलिंद राऊत, विराज आपटे, सिद्धेश ब्राह्मणकर, वरुण खेर, प्रतीक जोशी, अश्विन वैद्य, सम्यक कानिंदे व सोनाली फडके या मोहिमेत सहभागी झाले आहेत. आम्ही शासन यंत्रणेला आणि स्थानिक लोकांनाही याबद्दल पटवून सांगत आहोत.