एपिलेप्सी म्हणजे वेड नव्हे

Yashoda-Wakankar
Yashoda-Wakankar

आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी जनजागृती दिनाच्या (१२ फेब्रुवारी) निमित्ताने ‘एपिलेप्सी’बाबत जनजागृतीसाठी आणि त्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी वधूवर मंडळ चालविणाऱ्या ‘संवेदना फाउंडेशन’च्या संस्थापक यशोदा वाकणकर यांच्याशी सलील उरुणकर यांनी साधलेला संवाद.

प्रश्‍न - ‘एपिलेप्सी’ व्याधीबद्दल जनजागृतीची गरज का भासते? 
-एपिलेप्सी म्हणजेच फीट, फेफरे, आकडी या नावाने ओळखली जाणारी व्याधी आपल्या समाजात अजूनही कमी लेखली जाते. गंमत म्हणजे हृदयविकार, मधुमेह यांसारखे आजार असले की आपण सर्वांसमोर त्याबाबत बोलतो पण ‘एपिलेप्सी’सारखा अप्रतिष्ठित आजार मात्र जास्तीत जास्त प्रमाणात लपवलाच जातो. एपिलेप्सी ही एक मेंदूची व्याधी आहे आणि न्यूरॉलॉजिस्टच्या उपचारांनी ती पूर्ण आटोक्‍यात राहू शकते. त्यात कोणतीही भूतबाधा किंवा देवाचा कोप नाही. ज्यांना औषधोपचारांनीही काही फरक पडत नाही त्यांच्यासाठी ‘ब्रेन सर्जरी’ हा उपाय असू शकतो. एपिलेप्सी म्हणजे वेड नाही, ती बरी होणारी व्याधी आहे. 

प्रश्‍न - ‘एपिलेप्सी’विषयी गैरसमज कमी कसे करता येतील? 
-एपिलेप्सी ही फक्त शारीरिक व्याधी नसून आपल्याकडे ती सामाजिक व्याधीसुद्धा आहे. एपिलेप्सी असलेल्या मुलांना शाळेतून काढले जाते. एपिलेप्सी असलेल्या मुलाला कॉलनीत खेळणारी मुले सामावून न घेता दूर ठेवतात. त्याला हसतात. त्याची टिंगल करतात आणि त्यामुळे आधीच त्रास असलेली मुले मनाने निराश बनू शकतात व एकलकोंडी पडू शकतात. अशावेळी पालकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. आम्ही नेहमी सुचवितो, की पालकांनी इतर पालकांना जाऊन भेटावे, त्यांना एपिलेप्सी बद्दल सांगावे. तसेच कॉलनीतल्या मुलांना एकत्र करून त्यांना देखील गोडीगुलाबीने माहिती द्यावी. त्या सर्वांमध्ये मिसळल्याशिवाय मुलाचे एकटेपण सहज जात नाही. 

प्रश्‍न - ‘एपिलेप्सी’ रुग्णांचे विवाह जुळविण्यात काय अडचणी येतात? 
-एपिलेप्सीचा इतिहास असलेल्या तरुण मुलामुलींमध्ये लग्न जमणे ही समस्या आढळून येते. काही सुशिक्षित तरुण मुले-मुली कधी येऊन आम्हाला विचारायची, ‘आम्हाला कंट्रोल्ड एपिलेप्सी आहे, तर आम्ही लग्न ठरवताना ते सांगू की नको?’ अनेक पालक येऊन म्हणतात की मुलगी दिसायला तर छान आहेच, शिवाय शिक्षणसुद्धा भरपूर झाले आहे.. पण आम्हाला हिच्या लहानपणाची एपिलेप्सी लपवायची नाहीये. त्यामुळे लग्नच जमत नाही. 

प्रश्‍न - ‘एपिलेप्सी’ग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबीयांनी, मित्रांनी काय करावे? 
-समोरच्या व्यक्तीकडे आधी आपण ‘माणूस’म्हणून बघायला शिकलं पाहिजे. त्याच्या आजाराचे लेबल लावून बघून कसं चालेल? एखादे नॉर्मल जोडपे असेल, अगदी बघून लग्न केलेले, तरी त्यांचे खूप चांगलेच जमते असे कुठे? उलट तुम्ही एखाद्या व्याधीतून गेलेला असाल तर दुस-या व्यक्तीकडे तुम्ही सहृदयतेने पाहू शकता, एकमेकांना जास्त चांगले समजू शकता. त्यामुळे आजाराकडे ‘संकट’ म्हणून न पाहता तुम्ही एक ‘संधी’ म्हणून सुद्धा पाहू शकता, ज्या संधीचे तुम्ही सोने करू शकता. आपल्या व्याधी बद्दल तुम्ही समोरच्याला कसं सांगताय, यावर सुद्धा समोरच्याचा रिस्पॉन्स अवलंबून असतो. म्हणजे, लग्न ठरवताना तुम्ही जर स्वतःला खूपच कमी लेखून अगदी भीत भीत सांगितले, की तुम्हाला एपिलेप्सी आहे, तर समोरचा सुद्धा तुम्हाला एक ‘बिचारा’ किंवा ‘कमी’ याच नजरेतून बघेल. त्या ऐवजी तुम्ही आधी स्वतःला ओळखा, स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. आधी स्वतःबद्दलच्या सर्व सकारात्मक गोष्टी सांगा आणि मग तुमच्या एपिलेप्सी बद्दल तुम्ही अतिशय आत्मविश्वासाने, आत्मनिर्भरतेने, स्वाभिमान राखून सांगितले, तर समोरचा सुद्धा तुम्हाला वेगळा, चांगला प्रतिसाद देऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com