वाहनतळांवर जादा दराने वसुली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणे - महात्मा फुले मंडईतील महापालिकेच्या ‘आर्यन’ आणि ‘मिनर्व्हा’ येथील वाहनतळांवर ठरवून दिलेल्या दरांपेक्षा संबंधित कंत्राटदार जादा दराने वसुली करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे; तर याबाबत कारवाई करीत आहोत, असा दावा महापालिकेने केला आहे. 

पुणे - महात्मा फुले मंडईतील महापालिकेच्या ‘आर्यन’ आणि ‘मिनर्व्हा’ येथील वाहनतळांवर ठरवून दिलेल्या दरांपेक्षा संबंधित कंत्राटदार जादा दराने वसुली करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे; तर याबाबत कारवाई करीत आहोत, असा दावा महापालिकेने केला आहे. 

वाहनतळांसाठी महापालिकेने दर ठरवून दिलेले आहेत. त्यानुसार आकारणीचे आदेश दिले आहेत; तसेच या दरांची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी दर आणि वाहनतळासाठीचे नियम असलेले फलक दर्शनी भागात लावण्याचे आदेशही महापालिकेने दिले आहेत. मात्र, आर्यन व मिनर्व्हा वाहनतळातील ठेकेदारांचे कर्मचारी नागरिकांकडून जादा दराने वसुली करीत आहेत. त्याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात, अशी तक्रार नागरिकांनी पालिकेकडे केली आहे.

याबाबत गुणेश परदेशी म्हणाले, ‘‘महापालिकेच्या वाहनतळांत दरफलक दर्शनी भागात लावण्याचा नियम आहे; परंतु संबंधित ठेकेदार दरफलक दिसणार नाही, अशा ठिकाणी लावतात. त्याकडे पालिकेचे अधिकारी हेतुतः दुर्लक्ष करतात. त्यामुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. स्वच्छता, पुरेसा प्रकाश आदी किमान सुविधाही येथे उपलब्ध होत नाहीत.’’

याबाबत महापालिकेच्या भूमी जिंदगी विभागाचे प्रमुख आणि उपायुक्त सतीश कुलकर्णी म्हणाले, ‘‘जादा दराने वसुली होत असेल तर, संबंधित ठेकेदाराला मासिक भाड्याच्या ५० टक्के रक्कम दंड म्हणून करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच दरफलक दर्शनी भागात लावण्याचेही आदेश दिले आहेत.’’

‘वृक्ष प्राधिकरण’चा ‘लौकिक’ बदलणार
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमधील नवनियुक्त सदस्यांनी तळजाई टेकडीवर वृक्षारोपण करून समितीच्या कामकाजास नुकतीच सुरवात केली. या समितीचा ‘लौकिक’ बदलण्याचा निर्धारही त्यांनी केला.  

वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्यातील कामकाज हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. या समितीवर सात नगरसेवक आणि सात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची नुकतीच नियुक्ती झाली. या समितीच्या पहिल्या बैठकीपूर्वी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासमवेत सदस्यांनी तळजाई टेकडीवर वृक्षारोपण केले. शहराचे पर्यावरण जोपासण्याची जबाबदारी वृक्ष प्राधिकरण समितीची असून त्यासाठी समितीच्या सदस्यांनी सजगतेने काम करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. 

या प्रसंगी समितीचे सदस्य आदित्य माळवे, संदीप काळे, धनंजय जाधव, अरविंद गोरे, सचिन पवार, मनोज पाचपुते, दत्तात्रेय पोळेकर, हाजी गफूर पठाण, वासंती जाधव, दीपाली धुमाळ, सुजाता शेट्टी, फरजाना शेख, कालिंदा पुंडे, शिल्पा भोसले यांनीही वृक्षारोपणाच्या उपक्रमात भाग घेतला. आगामी काळात शहराच्या सर्वच परिसरात वृक्षारोपण करण्याचा निर्धार सदस्यांनी व्यक्त केला. तसेच वृक्षभिशी, वृक्षदत्तक, वृक्षजागृती सप्ताह, वृक्षसंगोपन स्पर्धा आदी अनेक उपक्रम समितीच्या वतीने होणार असल्याचे काळे आणि जाधव  यांनी नमूद केले.