शहरातील निम्म्या नेत्रपेढ्या "दृष्टिहीन' 

रिना महामुनी-पतंगे
सोमवार, 12 जून 2017

पुणे - शहरातील निम्म्या नेत्रपेढ्या "दृष्टिहीन' असल्याची माहिती राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातून पुढे आली आहे. वीसपैकी दहा नेत्रपेढ्यांमधील माहितीच्या विश्‍लेषणातून गेल्या वर्षभरात एकही नेत्र संकलन झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

पुणे - शहरातील निम्म्या नेत्रपेढ्या "दृष्टिहीन' असल्याची माहिती राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमातून पुढे आली आहे. वीसपैकी दहा नेत्रपेढ्यांमधील माहितीच्या विश्‍लेषणातून गेल्या वर्षभरात एकही नेत्र संकलन झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शहर आणि जिल्ह्यामध्ये 20 नेत्रपेढ्या असल्याची नोंद आरोग्य खात्याकडे आहे. त्यापैकी अवघ्या दहा नेत्रपेढ्या सक्रिय आहेत. यातील बहुतांश नेत्रपेढ्या शहरातील आहेत. त्या मोठ्या रुग्णालयांशी संलग्न आहेत किंवा डोळ्यांच्या मोठ्या रुग्णालयांमध्ये त्या आहेत. स्वतंत्रपणे चालविण्यात येणाऱ्या नेत्रपेढ्यांमधून गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये नेत्रसंकलन होत नसल्याचे निरीक्षण राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण समितीमधील अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना नोंदविले. यापैकी बहुतांश नेत्रपेढ्यांनी त्यांच्या परवान्याचेही नूतनीकरण या वर्षी केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

वेगवेगळ्या कारणांनी दृष्टी गेलेल्या काही रुग्णांवर नेत्रप्रत्यारोपण हा प्रभावी मार्ग ठरतो. त्यातून त्यांची दृष्टी परत मिळते. त्यासाठी नेत्रदानाबाबत जनजागृती आवश्‍यक असते. अशा प्रतीक्षा यादीतील रुग्णांची संख्या वाढत असताना नेत्रपेढ्यांचे कार्य मात्र मंदावत असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. 

का मंदावतेय नेत्रपेढ्यांचे कार्य? 
- नेत्रपेढ्यांमध्ये कायम वैद्यकीय अधिकारी नियुक्त असावा लागतो. त्यातून तो नेत्रदानासाठी उपलब्ध असतो; मात्र गेल्या काही वर्षांपासून असे वैद्यकीय अधिकारी मिळत नाहीत, मिळाले तर त्यांचे वेतन नेत्रपेढ्यांना परवडत नाहीत. त्यामुळे या नेत्रपेढ्यांना पूर्ण क्षमतेने कार्य करता येत नाही. 
- मृत व्यक्तीचे नातेवाईक नेत्रदानासाठी बहुतांश वेळा मोठ्या रुग्णालयांशी संलग्न नेत्रपेढ्यांशी संपर्क साधतात. तेथे वैद्यकीय अधिकारी असल्याने त्यांना नेत्रसंकलन करणे सहज शक्‍य होते. स्वतंत्र नेत्रपेढीला हे शक्‍य होत नाही. 
- नेत्रपेढीची देखभाल दुरुस्ती, तेथील उपकरणे आणि कर्मचारी यांचा खर्च आवाक्‍याबाहेर गेला आहे. 
- नेत्रपेढ्यांनी विविध ठिकाणी जाऊन नेत्रदान करण्याविषयी जनजागृती न केल्याने नेत्रसंकलनाचे प्रमाण कमी झाले आहे. 

सर्वाधिक नेत्रसंकलन करणाऱ्या पहिल्या पाच नेत्रपेढ्या 
नेत्रपेढी नाव ..................नेत्र संकलन 
एस. जी. रुग्णालय ...........426 
वेणू माधव नेत्रपेढी .........312 
ॅएच. व्ही. देसाई नेत्रपेढी .....268 
जनकल्याण नेत्रपेढी ...........236 
एबीएमएच नेत्रपेढी ...173 

शहरातील दहा नेत्रपेढ्यांकडून नेत्रसंकलनाचे कार्य सातत्याने सुरू असते. उर्वरित नेत्रपेढ्यांमध्ये हे संकलन होत नाही. त्यांनी नेत्रपेढीच्या परवान्याचेही नूतनीकरण केले नाही. 
- डॉ. व्ही. एन. शिरसीकर, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक