फडकेंच्या स्मारकाचे सुशोभीकरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

पुणे - क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या संगम पुलाजवळील स्मारकाला अखेर नवसंजीवनी मिळणार आहे. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित झालेल्या या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी एका खासगी कंपनीने पुढाकार घेतला असून, शनिवारपासून (ता. ४) त्याला प्रारंभ होणार आहे.  

पुणे - क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या संगम पुलाजवळील स्मारकाला अखेर नवसंजीवनी मिळणार आहे. गेली अनेक वर्षे दुर्लक्षित झालेल्या या स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी एका खासगी कंपनीने पुढाकार घेतला असून, शनिवारपासून (ता. ४) त्याला प्रारंभ होणार आहे.  

शिवाजीनगरमध्ये संगम पुलाजवळ तेव्हा ‘सीआयडी’च्या ताब्यात असलेल्या जागेत २००६ मध्ये फडके यांचे स्मारक उभारण्यात आले. सीआयडीचे तत्कालीन प्रमुख जयंत उमराणीकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, त्यानंतर या स्मारकाकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे स्मारकाची रया गेली. या पार्श्‍वभूमीवर ‘टेक्‍नोफोर’ या खासगी कंपनीने स्मारकाच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेतला आहे. 

संगम पुलाजवळील ही वास्तू सध्या लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात आहे. ब्रिटिशकाळात येथे सत्र न्यायालय होते. येथे फडकेंवर खटला चालविण्यात आला होता. येथील कोठडीत फडके यांना १७ जुलै १८७९ ते ९ जानेवारी १८८० दरम्यान डांबण्यात आले होते. पुढे त्यांना एडनच्या तुरुंगात हलविण्यात आले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. प्रेरणादायी इतिहासाच्या या स्मृती जपण्याच्या उद्देशाने उमराणीकर यांनी स्मारकाची कल्पना मांडली. त्यासाठी लोकवर्गणीतून निधी उभारण्यात आला. तसेच, फडके स्नेहवर्धिनी संस्थेनेही त्यासाठी अर्थसाहाय्य केले. मात्र, दुर्दैवाने गेल्या दहा वर्षांत सीआयडी तसेच महापालिकेने हे स्मारक जपण्यासाठी पुढाकार घेतला नाही. परिणामी या स्मारकाची दुर्दशा झाली. 

ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांनी पूर्वी या स्मारकाला मूर्त रूप दिले होते. गुहेच्या आकारात असलेल्या या स्मारकाच्या आतील बाजूस भिंतीवर फडकेंच्या जीवनाचे प्रसंग चित्रित करण्यात आले आहेत. या स्मारकाच्या आजूबाजूला उद्यान करून तिथे नागरिकांना बसण्यासाठी सुविधा करण्यात आली होती. कोठडीचे रूपांतर ग्रंथालयातही करण्यात आले होते. मात्र, सध्या येथे उद्यानाचा अवशेषही आढळून येत नाही. उलट स्मारकाच्या बाजूला राडारोडा टाकण्यात आला आहे.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्यात इतिहासाची आठवण करून देणाऱ्या या स्मारकाची अशी दुर्दशा होणे दुर्दैवी आहे. त्यामुळे आम्ही या वास्तूच्या पुनर्निर्माणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दररोज साफसफाई करण्याची परवानगी सध्या आम्हाला मिळाली आहे. येत्या काळात स्मारकाचे गतवैभव पुन्हा आणण्यासाठी आवश्‍यक तो खर्चही कंपनी करेल. 
- प्रवीण ढोले, संचालक, टेक्‍नोफोर 

वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक मुळातच लोकवर्गणीतून उभारण्यात आले आहे. महापालिकेने किमान त्याची देखभाल दुरुस्ती तरी करावी, एवढीच अपेक्षा आहे. स्थानिक नगरसेवकांनी पुढाकार घेतल्यास स्मारकाचे वैभव पुन्हा कायम राहू शकेल आणि त्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल. 
- जयंत उमराणीकर, माजी पोलिस महासंचालक