बनावट डॉक्‍टरांविरोधात कारवाईत दिरंगाई! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

पुणे - महापालिकेच्या हद्दीत बनावट डिग्री घेऊन "प्रॅक्‍टिस' करणाऱ्या बनावट डॉक्‍टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात "एम. डी.- मेडिसिन' असल्याचे भासवीत दवाखाना थाटून बसलेल्या एका डॉक्‍टरविरोधात कारवाई करण्यास महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. कारवाईत दिरंगाईमुळे संबंधित डॉक्‍टर पसार झाला आहे. 

पुणे - महापालिकेच्या हद्दीत बनावट डिग्री घेऊन "प्रॅक्‍टिस' करणाऱ्या बनावट डॉक्‍टरांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात "एम. डी.- मेडिसिन' असल्याचे भासवीत दवाखाना थाटून बसलेल्या एका डॉक्‍टरविरोधात कारवाई करण्यास महापालिका प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. कारवाईत दिरंगाईमुळे संबंधित डॉक्‍टर पसार झाला आहे. 

मार्केट यार्ड परिसरात कोंढवा-बिबवेवाडी रस्त्यावरील "हेल्थ ऍण्ड हार्मनी क्‍लिनिक' व "मेहता क्‍लिनिक' अशा दोन दवाखान्यांमध्ये डॉ. रामकृष्ण कटकदौंड नामक व्यक्ती "एम. डी. मेडिसिन' असल्याचे भासवीत असल्याची तक्रार मिळाली. त्यानंतर महापालिकेच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पथकाने या क्‍लिनिकला भेट देऊन संबंधित डॉक्‍टरचे प्रमाणपत्र सत्यता पडताळणीसाठी मागितले. त्या वेळी डॉ. कटकदौंड यांनी, "लेखी पत्र दिल्याशिवाय माझी कागदपत्रे देणार नाही,' असे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे यांना सुनावले. त्यावर गतवर्षी ऑक्‍टोबर महिन्यात "बोगस वैद्यकीय व्यवसाय शोध समिती'च्या मासिक बैठकीत यावर चर्चा झाली. त्या वेळी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी "संबंधित डॉक्‍टरांविरोधात तातडीने कारवाई करा, लोकांचे जीव जाईपर्यंत वाट पाहणार का,' असा प्रश्‍न विचारीत कारवाईचे आदेश दिले. 

त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून संबंधित बनावट डॉक्‍टरचे व्हिजिटिंग कार्ड, औषधाची चिठ्ठी "महाराष्ट्र वैद्यकीय परिषदे'कडे सत्यता पडताळणीसाठी पाठविली. त्यासंदर्भात "एमएमसी'ने 8 जानेवारी रोजी अभिलेख तपासणी करून डॉ. कटकदौंड यांची नोंदणी नसल्याचे लेखी पत्र महापालिका प्रशासनाला पाठविले. त्यानंतर डॉ. कटकदौंड यांच्यावर महापालिका प्रशासनाकडून फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्‍यक होते. परंतु, फेब्रुवारी महिना संपत आला, तरी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. 

या संदर्भात पुणे महापालिकेच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, ""जानेवारीत "महाराष्ट्र वैद्यकीय परिषदे'कडून संबंधित डॉक्‍टरांची नोंदणी अस्तित्वात नसल्याचे लेखी पत्र मिळाले. त्यानंतर तातडीने जानेवारी महिन्यात क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना बनावट डॉक्‍टरांविरोधात स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र दिले होते. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना 16 फेब्रुवारीला स्मरणपत्रदेखील दिले आहे.'' 

वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश बेंडे म्हणाले, ""या संदर्भात डॉ. कटकदौंड यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गेलो होतो. त्या वेळी पोलिस प्रशासनाने कारवाई करण्याचे अधिकार असल्याचे "आज्ञापत्र' (पॉवर ऑफ ऍटर्नी) मागितले. ते घेऊन तीनदा पोलिस ठाण्यात गेलो होतो. परंतु, संबंधित अधिकारी सुट्टीवर होते. मंगळवारी (ता. 20) पुन्हा पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करणार आहे.'' 

कारवाईत दिरंगाईमुळे डॉक्‍टर पसार 
महापालिका प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन कागदपत्रे ताब्यात घेतली. जानेवारी महिन्यात "एमएमसी'कडून संबंधित डॉक्‍टरची नोंदणी नसल्याचे लेखी स्पष्ट करूनही कारवाईत दिरंगाई करण्यात आली. परिणामी, डॉ. राहुल कटकदौंड फरार झाल्याची माहिती स्थानिक नागरिक व महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Web Title: pune news fake doctor