कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांना ‘भूल’

योगिराज प्रभुणे
सोमवार, 19 जून 2017

पुणे - शस्त्रक्रियेत भुलीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्‍शनची खरेदी औषधांच्या घाऊक विक्रेत्यांनी थांबविल्याने सरकारी रुग्णालयांमधील कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. कंपनीतर्फे औषध विक्रीची सातत्याने मागविण्यात येत असलेली माहिती आणि दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) तपासणी, यामुळे गेल्या काही महिन्यांपासून भुलीच्या इंजेक्‍शनची खरेदी केली नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

पुणे - शस्त्रक्रियेत भुलीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्‍शनची खरेदी औषधांच्या घाऊक विक्रेत्यांनी थांबविल्याने सरकारी रुग्णालयांमधील कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. कंपनीतर्फे औषध विक्रीची सातत्याने मागविण्यात येत असलेली माहिती आणि दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) तपासणी, यामुळे गेल्या काही महिन्यांपासून भुलीच्या इंजेक्‍शनची खरेदी केली नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

राज्यातील सरकारी रुग्णालयांमधून प्रसूती आणि कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेसाठी भुलीचे इंजेक्‍शन स्थानिक पातळीवरून खरेदी केले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून भूल देण्याचे इंजेक्‍शन मिळत नसल्याची तक्रार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राज्याच्या कुटुंबकल्याण विभागाकडे केली. त्याचा थेट फटका सरकारी रुग्णालयांमधील कुटुंबकल्याणच्या शस्त्रक्रियांना बसला आहे. पुण्यासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये या शस्त्रक्रिया थांबल्याची माहितीही आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली. 

का थांबविली खरेदी?
भुलीचे इंजेक्‍शन बनविणाऱ्या कंपनीने घाऊक औषध विक्रेत्यांकडून या इंजेक्‍शनच्या विक्रीची माहिती मागविण्यास सुरवात केली आहे. या इंजेक्‍शनचा गैरवापर होण्याचा धोका वाटत  असल्याने त्याचा नेमका वापर कसा होतो, याची माहिती कंपनी घेत आहे. त्याचवेळी नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांची तपासणी करताना ‘एफडीए’चे अधिकारीही याची माहिती घेतात. या इंजेक्‍शनच्या विक्रीत तांत्रिक सोपस्कार जास्त आहेत, त्यामुळे या इंजेक्‍शनची खरेदी बंद केल्याची भूमिका औषध विक्रेत्यांनी मांडली. त्यामुळे भुलीचे इंजेक्‍शन रुग्णालयांमध्ये उपलब्ध होत नाही. याला पर्यायी इंजेक्‍शन

काचेच्या छोट्या बाटलीत उपलब्ध आहे. मात्र, ते हाताळताना फुटण्याचा धोका असल्याने सरकारी रुग्णालयांमधून याची मागणी होत नसल्याचेही निरीक्षण औषधविक्रेत्यांनी नोंदविले. 

याबाबत राज्याच्या कुटुंबकल्याण विभागातील सहसंचालक डॉ. नंदकुमार देशमुख म्हणाले, ‘‘कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेचा निधी जिल्ह्यांना देण्यात आला आहे. त्या निधीतून शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक औषधांची खरेदी स्थानिक पातळीवर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भुलीची औषधे मिळत नसल्याची तक्रार आली होती. मात्र, पुण्यातील काही घाऊक औषध विक्रेत्यांकडे हे इंजेक्‍शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तेथील अन्न व औषध प्रशासन विभागाशी समन्वय करून या इंजेक्‍शनची खरेदी करावी, अशी सूचना देण्यात आली आहे.’’

औषध कंपन्यांच्या डेपोमध्ये भुलीचे इंजेक्‍शन आहे; पण तेथून घाऊक औषध विक्रेत्यांनी खरेदी केलेली नाही. ही खरेदी का केली नाही, याची चौकशी तातडीने करण्यात येईल.
- किशोर चांडक, सहायक आयुक्त, एफडीए (औषध)

भुलीचे इंजेक्‍शन उपलब्ध करून द्यावे, याबाबत संबंधित घाऊक विक्रेत्यांना सूचना दिल्या जातील.
- अनिल बेलकर, सचिव, औषध विक्रेते संघटना, पश्‍चिम विभाग