'शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम सुरू'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

पुणे - शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी, शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे स्रोत उभे करावे लागणार आहेत. त्यासाठी विविध विभागांकडून शेतीपूरक व्यवसायांचा आराखडा बनविण्याचे तयार काम सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाकडून पूरक व्यवसायाचा आराखडा केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे, अशी माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी दिली. 

पुणे - शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी, शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे स्रोत उभे करावे लागणार आहेत. त्यासाठी विविध विभागांकडून शेतीपूरक व्यवसायांचा आराखडा बनविण्याचे तयार काम सुरू आहे. पशुसंवर्धन विभागाकडून पूरक व्यवसायाचा आराखडा केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे, अशी माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी बुधवारी दिली. 

"छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना' "कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रम' विधानभवन येथील मुख्य सभागृहात पार पडला.  या वेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, अपर निबंधक डॉ. आनंद जोगदंड, जिल्हाधिकारी सौरभ राव, विभागीय सहनिबंधक दीपक तावरे, सहकार संस्थेचे जिल्हा उपनिबंधक आनंद कटके, जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पालकमंत्री बापट म्हणाले, ""शेतीपूरक उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी वीज, पाणी, सौरऊर्जेवर आधारित प्रकल्पाना सुविधा देण्यात येत आहेत. गेल्यावर्षी जलयुक्त शिवार योजनेमुळे टॅंकरची संख्या कमी झाली आहे; परंतु दरवर्षी टॅंकरवर सुमारे तीनशे कोटी रुपये खर्च होतात. तो आता वाढला आहे. ग्रामीण भागातील रोजंदारी ही शेतीशिवाय होतच नाही. फळबागांसाठी गोदाम आणि वाहतूक सुविधा देण्यात येत आहे. मागील काळात मराठवाडा आणि विदर्भात जेव्हा कर्जमाफी जाहीर केली. त्या वेळी लेखापरीक्षणानंतर चारशे कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली होती. त्यासाठी ऑनलाइन अर्ज घेतले, त्याच्या छाननीमुळे उशीर झाला तरी अचूक आणि योग्य शेतकऱ्यांना लाभ दिला जाईल. ही केवळ सुरवात आहे. शेवटच्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईपर्यंत ही योजना सुरूच राहील.'' 

विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी कर्जमाफीच्या निर्णयाची पार्श्‍वभूमी सांगितली. जिल्हा उपनिबंधक कटके यांनी प्रस्ताविक केले. सहनिबंधक दीपक तावरे यांनी आभार मानले. 

पात्र शेतकऱ्यांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया 

आयुष्याला नवी उभारी 
कर्जमाफीमुळे डोक्‍यावरील मोठा बोजा कमी झाला आहे. निसर्गाचा कोप झालेला असताना ही मोठी मदत ठरणार आहे. यामुळे आमच्या आयुष्याला नवी उभारी मिळेल. 
कमल तानाजी पाचारणे, मु.पो. तिन्हेवाडी-सांडभोरवाडी, ता. खेड 

नव्या दमाने कामाला लागणार 
डोक्‍यावर कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे दुसऱ्या बॅंका आम्हाला उभे करत नाहीत. त्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली होती. कर्जमाफीमुळे सातबारा कोरा होईल. थकबाकी नसल्यामुळे पुढच्या हंगामासाठी बॅंका कर्ज देतील. त्यामुळे नव्या दमाने कामाला लागणार. 
शमशुद्दीन नबीराज शेख, कडबनवाडी, ता. इंदापूर