बारामतीत वाहू लागले दुधाचे पाट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

शेतकऱ्यांनी आजपासून कोणीही दुधाची वाहतूक करू नये, दूध घरच्या लोकांना द्यावे, एकदा तरी घरच्यांना पेढे, खवा खाऊ द्या असे आवाहन यावेळी शेतकऱ्यांनी करतानाच यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही, जर घरी न ठेवता दूध बाहेर पुरवठा करण्याची खुमखुमी ठेवली तर उद्यापासून दुधाचे कॅनही रस्त्यावर फोडू असा इशारा दिला

बारामती : राज्यव्यापी शेतकरी संपाची धग दुसऱ्या दिवशीही बारामतीत कायम राहीली. आज सकाळपासूनच पुन्हा एकदा आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी भाजी मंडई, दुधाचे टेम्पो यांना लक्ष्य केले. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात दूध विक्रीवर नियंत्रण आणले. रस्त्यात पकडलेले दूध ओतून देण्यात आले. यामुळे इंदापूर- बारामती रस्त्यावर दुधाचे पाट दिसत होते. दरम्यान बाजार समितीचे उपबाजार व भाजी मंडईत आज शुकशुकाट होता. 

आज सकाळी पहाटे काटेवाडी येथे शेतकऱ्यांनी पहिल्यांदा आंदोलन केले. येथे दुधाचे टॅंकर व टेम्पो अडवून शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पिंपळी येथील खासगी दूध प्रक्रिया प्रकल्पावर धडक दिली. येथे कोणत्याही परिस्थितीत आजपासून दूध स्वीकारले जाणार नाही. तसेच येथून दूध पाठविले जाणार नाही असे आश्वासन प्रकल्पप्रमुखांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी रस्त्यावरून ये-जा करणारे दुधाचे टेम्पो लक्ष्य केले. पिंपळी येथे दुधाचे टेम्पो अडवून पुन्हा संप मिटेपर्यंत दूध रस्त्यावर आणू नका, असे आवाहन करीत टेम्पोमधील दूध ओतून दिले.

शेतकऱ्यांनी आजपासून कोणीही दुधाची वाहतूक करू नये, दूध घरच्या लोकांना द्यावे, एकदा तरी घरच्यांना पेढे, खवा खाऊ द्या असे आवाहन यावेळी शेतकऱ्यांनी करतानाच यापुढे कोणाचीही गय केली जाणार नाही, जर घरी न ठेवता दूध बाहेर पुरवठा करण्याची खुमखुमी ठेवली तर उद्यापासून दुधाचे कॅनही रस्त्यावर फोडू असा इशारा दिला.

दुसरीकडे आज सकाळीच गुनवडी चौकातील भाजी मंडईत जाऊन आंदोलकांनी भाजी मंडईत आज कोणी भाजीविक्री करणार नाही याची खातरजमा केली. दरम्यान कोणीही भाजीमंडईचे स्टॉल उघडणार नाही व विक्री करणार नाही असे भाजीविक्रेत्यांनी स्पष्ट केल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा नंदन दूध डेअरीकडे वळविला. बारामती दूध उत्पादक संघाच्या या प्रकल्पात आज दूध घेतले जात होते, ही माहिती मिळाल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. तेथेही त्यांनी रस्त्यावर टेम्पोमधील दूध ओतून दिले. रतिबासाठी दूध घेऊन जाणारेही आंदोलकांचे लक्ष्य बनले. ज्येष्ठ वकील भगवानराव खारतुडे, छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण, राजेंद्र गावडे, प्रताप पागळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमोल काटे, सतीश काटे बाजार समितीचे संचालक संजय काटे, सुधीर पानसरे, ऍड. सन्‌व्विाघ, राजेंद्र ढवाण, अविनाश काळकुटे, राजेंद्र बोरकर, शीतल काटे आदींसह इतरही आंदोलक यामध्ये सहभागी होते.