बारामती बाजार पुन्हा चालू.. पुन्हा बंद...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 जून 2017

संप मागे घेतल्याच्या बातम्यांनी सुटकेचा निश्वास टाकत व्यापाऱ्यांनी बारामती बाजार समितीच्या जळोची उपबाजारात लिलावास सुरवात करण्याचा प्रयत्न केला, मात्र आज सकाळी पु्न्हा आंदोलक शेतकऱ्यांनी उपबाजारात जाऊन संप मागे घेतलेला नाही, याउलट सोमवारी महाराष्ट्र बंद आहे, तेव्हा तातडीने लिलाव बंद करा असे सुनावले.

बारामती : राज्यव्यापी शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बारामतीतही बाजार समितीचे उपबाजार व किरकोळ भाजीबाजार बंद करण्याचे प्रकार दोन दिवस सुरू राहिल्यानंतर अचानक संप मागे घेतल्याच्या बातम्यांनी विक्रेत्यांनी भाजी खरेदी केली, आज सकाळी मंडईतील विक्रीही सुरू केली, मात्र प्रत्यक्षात संप सुरूच असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केल्यानंतर पुन्हा मंडईत शुकशुकाट निर्माण झाला. 

बारामतीतील मंडईत पोलिस बंदोबस्त मागविल्यानंतर मंडईतील भाजीविक्री काही प्रमाणात सुरू राहील्यानंतर आज (ता.4) सकाळी पुन्हा एकदा आंदोलक शेतकऱ्यांनी भाजी मंडईतील विक्रेत्यांना संपात सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यानंतर पुन्हा एकदा तुरळक विक्री होत असलेल्या मंडईत आज रविवारचा दिवस असूनही शुकशुकाट होता.

दरम्यान संप मागे घेतल्याच्या बातम्यांनी सुटकेचा निश्वास टाकत व्यापाऱ्यांनी बारामती बाजार समितीच्या जळोची उपबाजारात लिलावास सुरवात करण्याचा प्रयत्न केला, मात्र आज सकाळी पु्न्हा आंदोलक शेतकऱ्यांनी उपबाजारात जाऊन संप मागे घेतलेला नाही, याउलट सोमवारी महाराष्ट्र बंद आहे, तेव्हा तातडीने लिलाव बंद करा असे सुनावले. त्यानंतर येथील लिलाव बंद झाले. मात्र गुनवडी चौकातील भाजी मंडईत किरकोळ भाजी विक्री थोड्याफार प्रमाणात सुरू राहीली. दरम्यान आंदोलक शेतकऱ्यांनी आज बारामती व्यापारी महासंघ तसेच विक्रेत्यांना आवाहन करून संपाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बारामती बंद ठेवण्याचे आज पुन्हा आवाहन केले.