भोरमध्ये दूध संकलन बंद; रस्त्यावर दूध ओतून निषेध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

दूध देणे बंद केले

भोर तालुक्‍यात 62 सहकारी दूधसंस्था आणि 10 खासगी डेअरी फर्ममधून जिल्हा दूध संघाकडे दररोज सुमारे आठ हजार लिटर दूध संकलन केले जाते. गुरुवारी सकाळी काही संस्थांकडूनच दूध संकलित करण्यात आले. त्यानंतर मात्र दूध उत्पादक व संस्थांच्या प्रतिनिधींनी संपावर जात असल्याचे सांगून दूध देणे बंद केले. 

भोर : शेतकऱ्यांनी संपाला पाठिंबा देत भोरमधील जिल्हा दूध संकलन केंद्रावर दूध देणे बंद केले. आज सकाळी काही शेतकरी व सहकारी दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी दूध संघाच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला. उद्या शुक्रवारपासून (ता.2) एकही शेतकरी किंवा दूध संस्था जिल्हा दूध संघाकडे दूध घेऊन येणार नाही, असे सांगण्यात आले. 

मंगळवारी सकाळी भोरमधील जिल्हा दूध संघाच्या संकलन केंद्रावर सकाळी काही शेतकऱ्यांनी दूध जमा केले. परंतु, काही वेळातच सर्व शेतकरी जमा झाले आणि त्यांनी संपाला पाठिंबा देत काही प्रमाणात दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध केला. या वेळी रामभाऊ कोंढाळकर, दत्तोबा सावले, सचिन शिवतरे, पांडुरंग गोरड, पांडुरंग किंद्रे, कृष्णा बोडके, एकनाथ शिळीमकर, अतुल किंद्रे, सुरेश शिंदे, नथू दामगुडे, भिकू किंद्रे, बाळासाहेब जेधे, बापू राजीवडे श्‍याम कुडले तसेच तालुक्‍यातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भोर तालुक्‍यात 62 सहकारी दूधसंस्था आणि 10 खासगी डेअरी फर्ममधून जिल्हा दूध संघाकडे दररोज सुमारे आठ हजार लिटर दूध संकलन केले जाते. गुरुवारी सकाळी काही संस्थांकडूनच दूध संकलित करण्यात आले. त्यानंतर मात्र दूध उत्पादक व संस्थांच्या प्रतिनिधींनी संपावर जात असल्याचे सांगून दूध देणे बंद केले. 

शहरात जाणारा भाजीपाला बंद 
तालुक्‍यातून पुण्या-मुंबईत पाठविला जाणारा भाजीपाला बंद करण्यात आला आहे. तालुक्‍यातील शेतकरी संपावर जात असून त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव करून सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे या वेळी उपस्थित असलेल्या सरपंचांनी सांगितले. दरम्यान, शहरातील भाजी मंडईत गुरुवारपूर्वी आलेल्या मालाची विक्री करून नव्याने माल घेणे बंद केले जाणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.