फेरपरीक्षा उत्तीर्णांना व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

सरकारचे धोरण; बारावीच्या निकालानंतर ऑनलाइन नोंदणी करता येणार

पुणे - विद्यार्थ्यांवरील ‘नापास’चा शिक्का पुसण्यासाठी राज्य सरकारने बारावीच्या फेरपरीक्षेचा निर्णय घेतला. आता फेरपरीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे ऑनलाइन नोंदणी करून संस्था स्तरावर प्रवेश घेऊ शकतील.

अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम मुदत ही १४ ऑगस्ट असते. फेरपरीक्षेचा निकाल त्यानंतर जाहीर होत असल्याने परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहावे लागत होते. यात बदल करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती. परंतु, प्रवेशाची अंतिम मुदत ही १४ ऑगस्ट करण्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्याने सरकारला त्यात बदल करता येत नव्हता.

फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनादेखील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची संधी मिळावी, अशी विनंती राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली. तसेच, फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची हुकणारी संधी आणि रिक्त राहणाऱ्या जागांचा मुद्दा नमूद केला. त्यावर न्यायालयाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी देण्याचा आदेश देऊन प्रवेशाची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट करण्यासंबंधी सूचित केले.

निकाल २२ ला शक्‍य
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार तंत्रशिक्षण संचालनालयाने त्यासंबंधीचे परिपत्रक जारी केले आहे. बारावीचा निकाल २२ ऑगस्ट रोजी जाहीर होणार असल्याचे गृहीत धरले आहे. त्यापुढे दोन दिवसांत विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी, तसेच मदत केंद्रांवर आवश्‍यक कागदपत्रांची पडताळणी करून घेता येईल. त्यानंतर संस्था स्तरावर प्रवेश घेता येईल.

केंद्रीय प्रवेशाच्या सर्व फेऱ्या झाल्या आहेत, त्यामुळे फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संस्था स्तरावरच प्रवेश घेता येईल. त्यामुळे या विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसारख्या सवलती मिळणार नाहीत. दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमाच्या संस्था स्तरावर प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीची मुदत २४ ऑगस्ट आहे. दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल त्यापूर्वी लागल्यास उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदविकेला प्रवेश घेता येईल.
- राजेंद्र गायकवाड, सहायक संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे फेरपरीक्षेत पात्र विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेशाची संधी मिळेल. तसेच, या अभ्यासक्रमांच्या रिक्त राहणाऱ्या जागा भरण्यासही मदत होईल.
- डॉ. दयानंद मेश्राम, सहसंचालक, तंत्रशिक्षण संचालनालय