‘फिटनेस’साठी अत्याधुनिक तंत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

पुणे - तंदुरुस्तीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरण्याचा कल तरुणांमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे खाण्यापासून ते चालण्यापर्यंत प्रत्येक वेळी ‘फिटनेस’ला प्राधान्य देऊन त्यानुसार आपली जीवनशैली निश्‍चित करणाऱ्या तरुणांची संख्या शहरात वाढत असल्याचे दिसत आहे. 

पुणे - तंदुरुस्तीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरण्याचा कल तरुणांमध्ये निर्माण होत आहे. त्यामुळे खाण्यापासून ते चालण्यापर्यंत प्रत्येक वेळी ‘फिटनेस’ला प्राधान्य देऊन त्यानुसार आपली जीवनशैली निश्‍चित करणाऱ्या तरुणांची संख्या शहरात वाढत असल्याचे दिसत आहे. 

आपली शारीरिक तंदुरुस्ती आणि सवयींचा घनिष्ठ संबंध असतो. सकाळी झोपेतून उठल्यापासून दिवसभराचे काम, त्यातील आहार आणि झोपण्याच्या वेळेपर्यंत प्रत्येक घटकाचा प्रभाव आरोग्यावर होत असतो. या कामातील ताणतणावांचा दुष्परिणामही मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होताना दिसतो. याबाबतची अनेक निरीक्षणे वैद्यकीय तज्ज्ञांनी वेळोवेळी नोंदविली आहेत. जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल करण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी सातत्याने दिला आहे. आपण एखादा पदार्थ खाताने किती उष्मांक शरीराला मिळाला, त्यानंतर काही अंतर चालल्यानंतर त्यापैकी किती वापरला, याचे भान प्रत्येकवेळी राहतेच असे नाही; पण आता वेगवेगळ्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे याची माहिती क्षणार्धात मिळणे शक्‍य झाले आहे. त्या आधारावर आजचे तरुण आपला आहार, व्यायाम, जीवनशैलीचे नियोजन करत आहेत. 

आधुनिक काळात त्यासाठी मोबाईलमधील वेगवेगळे ॲप आहेतच; पण हातात घालण्याचे पट्टेही आहेत. त्यातून शरीरातील उष्मांक, त्याचा वापर, रक्तदाब, हृदयाचे ठोके यांची अद्ययावत माहिती मिळते. त्यानुसार आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करण्याची प्रेरणा यातून मिळत असल्याचे तरुणांनी सांगितले. 

मोबाईलमधील ॲपचा वापर करून स्वतःच्या आरोग्याचा आराखडा रेखाटणारा महाविद्यालयीन तरुण ओंकार ढगे म्हणाला, ‘‘आतापर्यंत आपण फक्त खात होतो. त्यातून किती ऊर्जा शरीराला मिळाली, त्याची सांख्यिकी माहिती मिळण्याचा कोणताच स्रोत नव्हता. त्यामुळे मिळालेला उष्मांक कमी करण्यासाठी किती व्यायामाची गरज आहे, ती माहिती आता मोबाईलमधील ॲपमधून मिळते. त्यामुळे आपला आहार आणि जीवनशैलीचा ताळमेळ घालता येतो.’’

पूर्वी फक्त डॉक्‍टरांकडे गेल्यानंतरच रक्तदाब तपासला जात असे; पण आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे हातात घातलेल्या पट्ट्यातून रक्तदाब तपासता येतो. तसेच शरीरातील उष्मांक मोजता येतो. आपल्याला दिवसभरात किती उष्मांक लागतो आणि प्रत्यक्षात आपण किती घेतो? याची माहिती मिळते. तसेच दिवसभरात आपण चाललेली पावले, त्यासाठी वापरलेल्या ऊर्जेचाही हिशेब दिवसाच्या शेवटी हे तंत्रज्ञान देते.
- कविता वायाळ, विद्यार्थिनी, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय