उघड्यावरती 'खेळ' मांडला!

उघड्यावरती 'खेळ' मांडला!

शहरातील कोणताही रस्ता, चौक, बस स्थानक, रेल्वे स्थानक, रुग्णालये असो किंवा एखादी गल्ली... प्रत्येक ठिकाणी हातगाड्या व स्टॉल्सवरील खाद्य पदार्थांवर ताव मारणारे खवय्ये दिसणारच! गेल्या काही वर्षांत मुख्य रस्त्यांसह पेठांमध्येही अनेक खाऊगल्ल्या झाल्या आहेत. वडापाव, भजी, मिसळ, उत्तप्पा, डोसा, पॅटिस, सॅंडविचपासून ते पोळी-भाजीपर्यंत आणि व्हेज रोल, पिझ्झा, बर्गरपासून ते अप्पे यांसारख्या पदार्थांची येथे विक्री केली जाते. पण, रस्त्यावर अन्नपदार्थ तयार करून त्याची विक्री करण्यास कायद्याने बंदी असतानाही बेकायदेशीररीत्या असे प्रकार सुरू आहेत. या प्रकाराकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणाबाबत ‘सकाळ’ने केलेली पाहणी.
 

असा आहे फरक
 हॉटेल दर    रस्त्यावरचे दर

पोहे/उपीट/शिरा    ३०-४०    १०-१५
मिसळ    ५०-८०    २०-३०
इडली-सांबर    ४०-७०    १५-३०
वडा-सांबर    ४०-७०    १५-३०
डोसा-उत्तप्पा    ५०-८०    १५-३०

कायदा पाळून होऊ शकतो व्यवसाय
बोपोडी आयटी पार्कसमोर नोकरदारांना सकाळी वडा सांबारपासून ते भाजी-पोळीपर्यंतचे तयार पदार्थ मिळतात. या ठिकाणचे पदार्थ हातगाडीवर तयार केले जात नाहीत, तर विक्रेते घरात तयार करून या ठिकाणी विक्री करतात. शहरातही अशी काही उदाहरणे आहेत. पोहे, वडासांबर, इडली असे पदार्थ घरात तयार करून रस्त्यावर आणून विकतात. भाजी, पोळी, पुलाव आदी पदार्थांची अशा पद्धतीने विक्री होत आहेत. त्यामुळे कायदा पाळून हा व्यवसाय करता येऊ शकतो, हे स्पष्ट होते.

नागरिक आरोग्य धोक्‍यात का घालतात?
रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांचे दर हॉटेलच्या तुलनेने कमी आहेत. तसेच हे पदार्थ रस्त्यावर सहज उपलब्ध होत असल्याने या पदार्थांकडे नागरिकांचा ओढा असतो; मात्र हे पदार्थ बेकायदेशीररीत्या रस्त्यावर बनविले जातात आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात येते. याबाबत नागरिक मात्र अनभिज्ञ असतात. तसेच प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने अशा पदार्थांची रस्त्यावर सर्रास विक्री होत आहे.

नागरिकांची सोय; पण आरोग्य धोक्यात

अस्वच्छ ठिकाणी पदार्थांची केली जातेय विक्री

अस्वच्छ पाणी, धूळ अन्‌ पदार्थांवर माशा-कीटक 

कायदा आणि स्वच्छता न पाळल्याने आरोग्य धोक्‍यात

फर्ग्युसन रस्ता/ज्ञानप्रबोधिनी
उघड्यावर विकले जाणारे शिजवलेले मक्‍याचे दाणे... रगडा-पाणीपुरी...तळून ठेवलेले वडापाव, पॅटिस आदी खाद्यपदार्थ... सॅंडविच, बर्गरसाठी चिरून ठेवलेल्या भाज्या... त्यावर जमणारी धूळ...उघड्यावर बनवली जाणारी थालीपीठं, पराठा, पुलाव, सरबत... हे चित्र आहे तरुणाईच्या सर्वांत पसंतीच्या फर्ग्युसन रस्ता आणि ज्ञानप्रबोधिनी येथील खाऊगल्ल्यांचे. 
‘स्ट्रीट फूड’च्या नावाखाली येथे नागरिकांच्या आरोग्याला घातक असणारे पदार्थ विकले जात आहेत. वरवर स्वच्छतेचा दिखावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात पदार्थ बनविण्यापासून त्याची विक्री करण्यापर्यंतचा प्रवास उघड्यावरच केला जात असल्याची सद्यःस्थिती आहे. दिवसभर पदार्थ उघड्यावरच ठेवल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. त्याचबरोबर या हातगाड्या, स्टॉल्समुळे पादचाऱ्यांची गैरसोय होऊन वाहतूक कोंडीत भर पडत आहे. शहरातील गर्दीच्या ठिकाणी रस्त्यांवर, पदपथावर या खाद्यपदार्थांच्या गाड्या उभ्या असतात. त्यामुळे तेथील अस्वच्छतेचा परिणामही खाद्यपदार्थांवर होत आहे.

लालबहादूर शास्त्री रस्ता
हातगाड्यांभोवती कमालीची अस्वच्छता, कचऱ्याने भरलेले डबे, डबक्‍यांमधील पाण्यामुळे पसरलेली दुर्गंधी, अशा अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ तयार करून त्याची विक्री केली जात असल्याचे चित्र लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील हातगाड्या, स्टॉल्सवर दिसून आले. त्यामुळे वडापाव, भजी, उपीट यांसारख्या चटपटीत पदार्थांवर ताव मारणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

दररोज सायंकाळी साडेचार वाजल्यापासून या रस्त्यावरील विक्रेते उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करतात. काही विक्रेते घरात पदार्थ तयार करून आणून ते हातगाड्यांवर विकतात. मात्र त्यांची संख्या कमी आहे. उर्वरित विक्रेते मात्र हातगाड्यांवरच पदार्थ तयार करतात. त्या शेजारी घाण, दुर्गंधी, कचरा, जागोजागी 

डबके साचल्याचे चित्र पाहायला मिळत असून माश्‍या, कीटक व डासांचाही प्रादुर्भाव असतो. अशा वातावरणात उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करून ते 
विक्रीसाठी ठेवले जातात. ते बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्यही निकृष्ट दर्जाचे असते. 

पावसाळ्यात रोगराई पसरू नये, यासाठी महापालिका प्रशासन दरवर्षी काळजी घेते. मात्र अनारोग्यास कारणीभूत असलेल्या खाद्यपदार्थांच्या हातगाड्या, स्टॉल्सवर अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याची सद्यःस्थिती आहे. रस्त्यावरील धूळ या पदार्थांवर साठते. तसेच त्यावर माश्‍या घोंघावत असतात. हेच पदार्थ ग्राहकांना गरम करून खाण्यासाठी दिले जातात. ते बनविण्यासाठी आणि पिण्यासाठीचे पाणीही अस्वच्छ असल्याचे चित्र परिसरात दिसून आले.

जंगली महाराज रस्ता 
खाऊगल्लीमध्ये उघड्यावरच भजी बनविण्यासाठी एका भांड्यात पीठाचे मिश्रण करताना आचारी...जवळच सिलिंडरवर पीठाचे गोळे तयार करणारी मुले...हातगाडीच्या कोपऱ्यालाच गॅसवर पोळ्या, धपाटे भाजून देणारे काही जण...पदार्थांवर घोंगावणाऱ्या माश्‍या...तेच पदार्थ खाताना नागरिक...गाडीशेजारीच दुर्गंधीयुक्त कचरा आणि तिथेच ठेवलेले पिण्याचे पाणी...असे चित्र जंगली महाराज रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर दिसून आले. 

‘स्पेशल धपाटे’, ‘गरमागरम भजी, वडापाव’, ‘रुचकर साबुदाणा वडे’, ‘स्पेशल दार्जिलिंग मोमोज्‌’ अशा आकर्षक जाहिराती लावलेल्या हातगाड्यांवरील खाद्यपदार्थांवर ताव मारणाऱ्यांचे आरोग्य येथील अस्वच्छ वातावरणामुळे धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे.

जंगली महाराज रस्त्याच्या सुरवातीपासून डेक्कनपर्यंतच्या रस्त्याच्या कडेला उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या, स्टॉल्सची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. उघड्यावरच कांदा, बटाटा, मिरची व अन्य भाज्या कापणे, दिवसभर उघड्या असलेल्या पोत्यातून बेसन, गव्हाचे पीठ घेणे, त्याचे मिश्रण करणे, पदार्थ तळणे, भाजणे या गोष्टी केल्या जातात. पदार्थ तयार करताना त्यामध्ये धूर, धूळ जाते. कचऱ्याच्या ड्रमवर बसणाऱ्या, दुर्गंधीयुक्त पाण्यावर घोंगावणाऱ्या माश्‍या उघड्यावर ठेवलेल्या पदार्थांवर बसतात. तेच पदार्थ ग्राहकांच्या हातांवर टेकवून विक्रेते पैसे कमावत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. असे असतानाही येथे खवय्यांची गर्दी होत आहे.

जंगली महाराज मंदिरासमोरील रस्त्याच्या पलीकडील खाऊगल्ली, जी. एम. भोसले भुयारी मार्ग चौकातील हातगाड्या, स्टॉल्स, काकासाहेब गाडगीळ पुलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कोपऱ्यावरील स्टेट बॅंक व देना बॅंकेजवळील खाऊगल्ली आणि डेक्कन बसथांब्याजवळील खाद्यपदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी उघड्यावर व अस्वच्छ वातावरणातच खाद्यपदार्थ शिजवून त्याची विक्री केली जात आहे.

परवाना आवश्‍यक
जाणीव संघटनेचे सचिव आणि शहर फेरीवाला संघटनेचे सदस्य संजय शंके म्हणाले, ‘‘पथारीवाले, फेरीवाले खाद्यपदार्थ विकू शकतात. त्यासाठी त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचा (एफडीए) परवाना घेणे आवश्‍यक आहे. ‘जाणीव’ने शहरातील १३ हजार पथारी व्यावसायिकांना पाच वर्षांसाठी परवाने काढून दिले आहेत. तसेच एफडीएने त्यांना प्रशिक्षणही दिले आहे. खाद्यपदार्थ स्वच्छ असावेत, यासाठी संघटनाही प्रयत्नशील आहे.’’

शहरात उघड्यावर खाद्य पदार्थ तयार करण्यास बंदी आहे; मात्र हातगाड्या आणि स्टॉलवर ते तयार केले जातात. अशा व्यावसायिकांवर नियमित कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्याकडून दंडही वसूल केला जात आहे. 
- संध्या गागरे, प्रमुख, अतिक्रमण विभाग

आयुक्तांच्या आदेशाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचा महापालिका आयुक्तांनी दिलेला आदेश कागदोपत्रीच राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यावसायिकांची पाहणी करण्याची साधी तसदीदेखील प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे शहरभर सर्रास उघड्यावर खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत आढळून आले आहे. 

दरम्यान, रस्त्यावर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करून त्यांना दंड केला जात असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे सांगण्यात आले; मात्र नेमकी किती व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली, याचा कोणताही आकडा अधिकाऱ्यांकडे नाही. त्यामुळे कारवाई नावापुरतीच केली जात असल्याचे दिसून येत आहे. 

उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करण्यास बंदी आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून हातगाडी आणि स्टॉलवर हे पदार्थ तयार केले जातात. कारवाई होत नसल्याने मिळेल त्या ठिकाणी हातगाड्या आणि स्टॉल उभारले जात आहेत. परिणामी वाहतुकीला अडथळा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर बेकायदा व्यावसायिकांची पाहणी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा आदेश आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला दिला होता. त्याची लगेचच अंमलबजावणी करण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली होती.

प्रत्यक्षात मात्र दोन महिन्यांचा अवधी लोटला, तरी कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात उघड्यावर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या विक्रेत्यांचे प्रमाण वाढत आहे.

हे करण्याची गरज...

खाद्य पदार्थ विक्रीचा स्टॉल, हातगाडीसाठी महापालिकेची परवानगी हवी
अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी हवी
खाद्य पदार्थ घर, दुकानात तयार करून आणणे गरजेचे
अशा ठिकाणी बाहेर तयार केलेले पॅकबंद खाद्य पदार्थ विकता येतात
पिण्याच्या पाण्याबाबत तसेच पदार्थ बनविताना स्वच्छता पाळावी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com